अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, आर्वी तालुक्यातील चोपण परिसरातील घटना
By महेश सायखेडे | Updated: August 29, 2023 17:43 IST2023-08-29T17:42:24+5:302023-08-29T17:43:33+5:30
जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी

अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, आर्वी तालुक्यातील चोपण परिसरातील घटना
वर्धा : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना आर्वी तालुक्याच्या चोपन या शेत शिवारात घडली. सुधाकर देवबा आसोले (४२) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
सुधाकर आसोले हे शेती करून कुटुंबियांचे पालन-पोषण करतात. ते सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करीत होते. दरम्यान अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला. यात सुधाकर आसोले हे गंभीर जखमी झाले. सुधाकर यांनी आरडा-ओरड करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान अस्वलीने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमी शेतकरी सुधाकर आसोले यांना आर्वी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती वनविभागाचे डेहनकर, भाकरे, अडसड यांना देण्यात आली आहे. जखमी शेतकऱ्याला वनविभागाने तातडीची शासकीय मदत द्यावी. तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.