बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By admin | Published: May 13, 2017 01:11 AM2017-05-13T01:11:04+5:302017-05-13T01:11:04+5:30
येथील जाम शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात शेतकरी बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येथील जाम शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात शेतकरी बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. शेषराव पंचफुले असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जाम शिवारातील अमित काळे यांच्या शेतात काम करीत असलेल्या शेषराव पंचफुले यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. याची महिती मिळताच पर्यावरण बचाव समितीचे तुषार साबळे यांनी घटनास्थळ गाठत शेषराव यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या कानावर व छातीवर जबर जखमा झाल्या आहेत. वनविभाग आर्वी येथील वनक्षेत्र सहायक एस.एस. बन्सोड यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जात पाहणी केली व बिबट्याचा आजुबाजुच्या शिवारात शोध घेतला. यांना बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले. यावेळी बिटरक्षक आर.के. तांबेकर, एस.वी. सावंत यांची चमू सोबत होती. जखमी व्यक्तीच्या मुलाला भेटुन वनपरिक्षेत्र कार्यालयात मदतीकरिता तात्काळ अर्ज सादर करण्यास सांगितले.