शेतकरी लागला खरिपाच्या तयारीला
By admin | Published: May 10, 2014 12:25 AM2014-05-10T00:25:56+5:302014-05-10T00:25:56+5:30
‘झाले गेले विसरूणी जावे, पुढे-पुढे चालावे’, या उक्तीनुसार शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामाकरिता शेतकरी सज्ज झाला
घोराड : ‘झाले गेले विसरूणी जावे, पुढे-पुढे चालावे’, या उक्तीनुसार शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामाकरिता शेतकरी सज्ज झाला असून शेतातील उलंगवाडीच्या कामाला वेग आला आहे. गतवर्षी खरीप व रबी हंगामात एन पीक काढणीच्यावेळी पावसाने कहर बरसल्याने शेतकर्यांना हाती आलेले पीक गमवावे लागले. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागला. मृग नक्षत्रापासूनच पावसाने लावलेली दमदार हजेरी अखेर शेतातील पिकाला खरडून नेण्यापर्यंत झाली. गाव-शेतात पाणी घुसल्याने शेतकर्याचे सुरूवातीलाच नुकसानीला सामोरे जावे लागले. यातून शेतात उर्वरीत पिकांच्या मळणीवेळी पुन्हा पाऊस आल्याने नुकसान सहन करावे लागले. यामुुळे शेतकरी आर्थिक हतबल झाले. यानंरच्या रबी हंगामाकडून शेतकर्याना अपेक्षा होती. मात्र गारपिटीने होत्याचे नव्हते केले. सततच्या नापिकीमुळे हतबल झालेल्या बळीराजाला जुने विसरुन येत्या खरीप हंगामासाठी सज्ज व्हावे लागले आहे. काही शेतकर्यांनी उन्हाळवाही केली असून पीक नियोजनात लागले आहे. तर काही शेतात कापूस वेचणी अजूनही सुरू आहे. मजूरांची कमतरता भासत असल्याने शेतातील अनेक कामे मात्र खोळंबली आहे.(वार्ताहर)