बोंडअळीच्या मदतीच्या घोषणेने शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:49 AM2017-12-24T00:49:47+5:302017-12-24T00:49:58+5:30
हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली. शिवाय शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनेही केली. याची शासनाला दखल घ्यावी लागली. शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकत भरघोस मदत जाहीर केली. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
कृषी सहायक प्रशांत भोयर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार पवनार शिवारात ५३९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. ४०० हेक्टरचा सर्व्हे आटोपला. काही शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद न केल्याने त्यांचा सर्व्हे करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. २०१७-१८ ची पीक नोंदणी तलाठी कार्यालयात सुरू आहे. पिकांची नोंद न करणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकणार नाही, तेव्हा अशा शेतकऱ्यांनी त्वरित नोंद करून घेण्याचे आवाहन तलाठी लवणकर यांनी दवंडीद्वारे केले आहे. यात ठेक्याने, मक्त्याने शेती करणाऱ्यांची मुख्य अडचण आहे. सुमारे २०० हेक्टर हेत्र हे ठेका, बटईने केलेले आहे. ठेकापत्र न केल्याने ही मदत मूळ मालकाला मिळेल. यामुळे ज्याचे नुकसान झाले, तो मात्र मदतीपासून वंचित राहील. मूळ मालक हा ठेक्याने जमीन देताना पूर्ण रक्कम आधीच घेत असतो. यामुळे त्यातून कपात करण्याची सोय नाही. ठेक्याने, बटईने शेती करणाऱ्यांचा वेगळा सर्व्हे करून जमीन कसणाऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता ठेकापत्र करायचे म्हटल्यास मूळ मालक तयार होत नसल्याचे दिसते.
बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्याने शेतात फिरविला नांगर
आर्वी - बोंडअळीने शेतकरी त्रस्त आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. परिणामी, बोंडअळीला कंटाळून आर्वी तालुक्यातील जळगाव येथील धनंजय चौबे या शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात ट्रक्टरद्वारे नांगर फिरविला आहे. उत्पन्नच मिळणार नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हा प्रकार तालुक्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो.
शेतकरी हवालदिल
नाचणगाव - गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात थैमान घातले. देवळी तालुक्यात या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. या अळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळी तालुक्यात २९,८३४ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली होती. पैकी २५,३५९ हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले. एकूण ४,३३५ शेतकऱ्यांनी जी फार्म अर्ज कृषी कार्यालय वा कृषी अधिकारी पं.स. देवळी यांना सादर केले. २१ डिसेंबरपर्यंत ९१२९.२४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शासनामार्फत करण्यात आले आहे. उर्वरित पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे.
मदतीबाबत संभ्रम
जी फार्म भरलेले शेतकरीच शासनाकडून बोंडअळीच्या मदतीस पात्र ठरतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॉकीट खरेदीची बिले अनेकांकडे नाही; पण नुकसान सर्वांचेच झाले आहे. बोंडअळीमुळे नुकसानापोटी कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफ मार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८००० रुपये, कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्याकडून मिळणारी १६ हजार रुपये मदत, अशी साधारणपणे ३० हजार ८०० रुपये मदत मिळणार आहे. बागायती कापूस उत्पादक शेतकºयांना ही मदत अधिक राहणार आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत राहणार आहे.