शेतकऱ्यांचे खाते कर्जातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:45 PM2018-01-07T23:45:48+5:302018-01-07T23:46:16+5:30
शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. या याद्यात नाव असलेल्या एकूण ३४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे बँक खात्यात रक्क्म आली तर २४ हजार ३४९ शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे खाते कर्जातच असल्याचे दिसते.
कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ९८ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार काम सुरू करण्यात आले असून याद्या जाहीर करण्याचे काम सुरू आहे. वर्धेत आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५७ शेतकऱ्यांना ४५३.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे बाकी आहे.
कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोजा; व्याजाचा बडगा कायम
शेतकºयांकरिता कर्जमाफीची योजना जाहीर होणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे यात मोठा कालावधी गेला. या काळात बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जावर व्याजाची आकारणी केली. शासनाने पाठविलेल्या याद्यात त्या काळातील कर्जाचा उल्लेख होता. मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेकडे गेल्यावर आकारलेले व्याज शिल्लक राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त नाही तर कर्जयुक्त राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात याचा लाभ झाला नसल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे. या कालावधीत चढलेले व्याज कोण भरणार असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.
कर्जमाफीच्या जाहीर यादीत वर्धा जिल्ह्यातील ५५ हजार २७२ शेतकरी दीड लाख रुपयांच्या आतील आहेत. त्यांची थकबाकी ४३७.२६ कोटी रुपये आहे. या पैकी ३२ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७.५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम आली नसून त्यांना कर्जमाफीची अद्याप प्रतीक्षा आहे.
नियमित कर्ज भरणाऱ्या १ हजार ९९० शेतकऱ्यांना ४.१७ कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. यातील केवळ १ हजार ७११ शेतकऱ्याच्या खात्यात ३ कोटी ५९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे नियमित कर्जभरणाऱ्या उर्वरीत २०० शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम येण्याकरिता काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.