वर्धेतून शेतकरी आंदोलनाची मुहुर्तमेढ रोवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:30 PM2018-09-12T22:30:55+5:302018-09-12T22:31:30+5:30
शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. वर्धेच्या शेतकरी आंदोलनाला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ अशी ग्वाही स्वाभीमान शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दिली. विदर्भातील कार्यकारणीच्या बैठकीसाठी ते वर्धेत आले होते. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोकळे, रवि पडोळे, भास्कर इथापे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, दूध आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता आॅक्टोंबरमध्ये शेतकऱ्यांसाठी भावाबाबत आंदोलन वर्धेवरून छेडण्यात येणार आहे. वर्धा शहरात हा पक्षाचा पहिलाच कार्यक्रम आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने पहिल्या अर्थसंकल्पात नद्या जोड प्रकल्पासाठी १ हजार कोटी रूपयाची अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्यानंतर पुढे या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात पडले. शाश्वत सिंचनाची जोड शेतीला दिल्या गेली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. या सर्वसमावेशक कार्यक्रमाला राबविण्याची हमी देणाºया पक्षाला भविष्यात पाठींबा देवू अशी माहितीही त्यांनी दिली. या बैठकीत स्वाभिमान शेतकरी संघटनेची वर्धा लोकसभा क्षेत्र कार्यकारणी घोषीत करण्यात आली. यात वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून भास्कर इथापे, जिल्हाध्यक्षपदी पवन तिजारे, जिल्हा सचिव एकनाथ डहाके, वर्धा विधानसभा अध्यक्ष जतिन रननवरे, वर्धा शहर अध्यक्षपदी सुयोग नवघरे, सेलू तालुका अध्यक्ष संजय धोंगडे, युवा अध्यक्ष वर्धा जिल्हापदी बबलु चौधरी, युवा अध्यक्ष वर्धा विधानसभापदी अमित कावळे, आर्वी विधानसभा प्रमुखपदी डॉ. गौरव वाघ, कारंजा तालुका अध्यक्ष रूपेश मस्के देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्षपदी मदन दांडेकर, देवळी शहर अध्यक्ष म्हणून राहुल भारती, पुलगाव शहर अध्यक्ष रितेश धांदे, हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी दशरथ ठाकरे, प्रदीप कांबळे, अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रमोद कानफाडे, यांची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती खा. शेट्टी यांनी दिली.