तुरीची खरेदी बंद केल्याने शेतकरी संतप्त
By admin | Published: April 23, 2017 02:10 AM2017-04-23T02:10:14+5:302017-04-23T02:10:14+5:30
नाफेडच्या तूर खरेदीचे शेवटचे दिवशीला बारदाण्या अभावी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी दुपारी १ वाजता बंद केली.
कृउबात बारदाण्याचा तुटवडा : पोलिसांनी केली मध्यस्थी
सेलू : नाफेडच्या तूर खरेदीचे शेवटचे दिवशीला बारदाण्या अभावी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी दुपारी १ वाजता बंद केली. संतापलेल्या शेतकऱ्यांनी कृउबास प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेता पोलिसांना मध्यस्थीकरीत संतप्त शेतकऱ्यांना शांत केले.
नायब तहसीलदार तिनघसे यांनी प्रत्यक्ष घटनस्थळी येत परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत नागपूर व सिंदी येथून बारदाणा बोलविण्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी बाजार समितीचे उपसभापती रामकृष्ण उमाटे यांनी मध्यस्थी केली. बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या नाफेड तूर खरेदीत मोठे घोळ असल्याचा आरोप यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला. सुरुवातीपासून कामकाज मंदगतीने सुरू असल्याने आवारात शेतमालाचे ढिग लागले होते. मध्यंतरी काही काळ बारदाण्या अभावी तूर खरेदी बंद होता. अनेक टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांचा माल तसाच पडून होता. काहींनी त्रासामुळे शेवटी कमी भावात व्यापाऱ्यांना तूर विकली. टोकण दिलेल्यांची तूर शेवटच्या दिवशीला घेणे गरजेचे होते. पण, माल घेण्यास नकार देत टोकण परत केल्याने सदर परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवसापासून पडून असलेल्या मालाचा काटा करणे दुपारी १ वाजता बंद केल्या गेला. बारदाणा व माणसं उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. परिणामी, शेतकरी संतापले. शेवटी कुउबाच्याच्यावतीने माल खरेदी करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)