दिवाळी सणासाठीच्या खरेदीत शेतकरी घेतोय हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 10:37 PM2022-10-23T22:37:11+5:302022-10-23T22:45:00+5:30

दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Farmers are busy shopping for Diwali festival | दिवाळी सणासाठीच्या खरेदीत शेतकरी घेतोय हात आखडताच

दिवाळी सणासाठीच्या खरेदीत शेतकरी घेतोय हात आखडताच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड संकटामुळे सलग दोन वर्षे सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. तर काेविडचा जोर कमी झाल्यावर हळूहळू निर्बंधात शिथिलता देत नंतर निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेत. परिणामी यंदा दिवाळी मोठ्या उत्साहातच साजरी होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अतिवृष्टीने मोडले कंबरडे
- यंदाच्या वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. परिणामी मोठे नुकसान झाले. तर मागील आठवड्यात ढगाळी वातावरण राहत पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची मळणी लांबली. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा उत्पादनात कमालीची घट येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हात आखडताच घेताना दिसत आहे.

लक्ष्मीची मूर्ती, झेंडूचे फूल, आकर्षक तोरणही बाजारपेठेत
- दिवाळीनिमित्त वर्धा बाजारपेठेत लक्ष्मीची मूर्ती व पोस्टर, आकर्षक असलेल्या पणत्या, झेंडूची फुले, विविध फटाक्यांसह इतर साहित्याने बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक आपल्या चिमुकल्यांसोबत सौभाग्यवतीसह गर्दी करीत आहेत. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती.

कपडे खरेदीसाठी अनेकांची बाजारपेठेत धाव
- दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठेतील कपडा लाईन भागातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने सजली आहेत. याच दुकानांमध्ये रविवारी सकाळपासूनच महिलांसह पुरुषांची कपडे खरेदीसाठी गर्दी होती. नवीन कपडे खरेदी करणाऱ्यांमध्ये शेतकरी बांधवांची संख्या नाममात्रच असल्याचे बाजारपेठेचा दुपारी १२ वाजता फेरफटका मारला असता बघावयास मिळाले. 
- कदाचित आज सायंकाळपर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव बाजारपेठेत दाखल होत दिवाळीचे औचित्य साधून खरेदी करतील, असा अंदाज एका कापड व्यावसायिकाने लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना वर्तविला.

शासकीय मदत ठरतेय तटपुंजी
- जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ३६५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तहसीलदारांमार्फत ७४ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत वितरित करण्यात आली आहे. शिवाय ही रक्कम सुटीच्या दिवसांतही शेतकऱ्यांना काढता यावी या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बँकांना एटीएममध्ये मुबलक पैसे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत प्राप्त शासकीय मदत तटपुंजी असल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे या शासकीय मदतीच्या रकमेतून अनेक शेतकऱ्यांनी शेतमजुरांची मजुरी तसेच उसनवारीची परतफेड केल्याने हे शेतकरी दिवाळी सणासाठीच्या खरेदीत हात आखडताच घेत आहे.

 

Web Title: Farmers are busy shopping for Diwali festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.