शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:04 PM2024-12-03T18:04:00+5:302024-12-03T18:04:53+5:30
२० मोटरी चोरीला : पोलिस प्रशासन सुस्त, शेतकऱ्यांवर मोठे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : शेतशिवारात ओलितासाठी लावलेल्या मोटारपंप, स्प्रिंकलर नोझल, वायर चोरट्यांच्या रडारावर आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी शेतशिवारात मोटारपंप चोरीचा सपाटा लावला असून, २० मोटारपंप चोरीला गेले आहेत. या चोरीच्या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात शेतकरी गेले असता पाच तास ठाण्याच्या बाहेर बसवून ठेवण्यात आल्याचा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांना ओलिताचे काम शेतशिवारात सुरू आहे. अशात शेतकऱ्यांकडून शेतात स्प्रिंकलर, तसेच पाटपाणी दिले जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतातील विहिरीवरील मोटार, स्प्रिंकलर नोझल, वायर चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. यात आतापर्यंत येथील शेतकरी हरिभाऊ डगवार, दिगांबर झोपाटे, स्वप्नील झोरे, आकाश वानखेडे, अमोल पोहेकर, आत्माराम गुल्हाने, सह अशा एकूण १८ ते २० शेतकऱ्यांच्या मोटारपंप पाइप केबल व स्प्रिंकलर नोझर चोरी गेले आहे. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे शेतात साहित्याचे रक्षण करण्यासाठी मजूर लावावेत का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
या प्रकरणाची शेतकरी पोलिस स्टेशन पुलगावला तक्रार देण्याकरिता गेले असता त्यांना ५ ते ६ घंटे बाहेर बसवून ठेवत थातूर-मातूर तक्रार नोंदविली जाते. मात्र, त्याची साधी चौकशी केली नसल्याने अजूनपर्यंत चोरी गेलेल्या मोटारी शेतकऱ्यांना परत दिल्या जात नाहीत. त्यामुळे पुलगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत केवळ धनधाकट्या लोकांच्याच घरी चोरी गेल्याच्या घटनांना गती देण्यात येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चोरी गेलेल्या प्रत्येक तक्रारीची प्रामाणिक चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार राजेशजी बकाने यांच्याकडे केली आहे.
आमदारांच्या फोननंतर होतो गुन्हा दाखल
- येथील शेतकरी दिगांबर झोपाटे, स्वप्निल झोरे, आकाश वानखडे या शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंप चोरीची घटना शनिवारी घडली.
- या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी शेतकरी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना ५ तास बाहेर बसवून ठेवण्यात आले.
- तास न् तास बसविल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट आमदारांना फोनवरून घटनेची स्थिती आणि पोलिसांच्या कार्यतत्परतेची तक्रार केली.
- त्यानंतर आमदारांनी पोलिसांची झाडाझडती घेतली. तेव्हा तक्रार घेण्यात आली.
- तब्बल ६ तासांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करून घेतला. तक्रार नोंदवून घेण्यासाठीही आमदाराची शिफारस लागणार का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतीसाहित्य चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष का?
गेल्या सहा सात महिन्यांपासून चोरट्यांचा परिसरात धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात तक्रारीही दाखल करण्यात आल्या. मात्र, पुढे कारवाई झाली नाही. मध्यंतरी कळंब पोलिसांनी मोटारपंप चोरी करणारे चोर पकडले असून, त्याच्या ताब्यातून १८ ते २० मोटारपंप जप्त केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्या चोरांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी करणे अपेक्षित होते. ती ही करण्यात न आल्याने गेल्या सहा महिन्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.