अॅग्रो कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:38 AM2017-07-20T00:38:11+5:302017-07-20T00:38:11+5:30
सालोड (हि.) येथील शेतकऱ्यांची नागपूर येथील अॅग्रो कंपनीच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्यासंदर्भातील
आमदारांना निवेदन : सालोड (हिरापूर) येथील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सालोड (हि.) येथील शेतकऱ्यांची नागपूर येथील अॅग्रो कंपनीच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्यासंदर्भातील तक्रार गुरूवारी शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या मार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत शेतकरी नत्थू सोनटक्के, अशोक धानकुटे, दादाराव वाघमारे, नत्थूजी धानकुटे, गणेश मुते, दिलीप क्षीरसागर, सुनील रागीट, हरिभाऊ जुडे, वासुदेव जुडे, कमला साखरे, रितेश घोडे, विठ्ठल तिमांडे, प्रदीप वाघ आदींनी म्हटले आहे की, आमच्या शेतातील तूर व चना नागपूर येथील अॅग्रो व्यापारी सुदर्शन राव यांना दिला. त्यांनी त्या मालाच्या मोबदल्यात आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम देतो म्हणून नागपूरच्या दोन बँकेचे धनादेश दिले. मात्र ते धनादेश वठले नाही. त्याचे पैसे मिळाले नाही. आमची फसवणूक झाली आहे. या हंगामात शेतीच्या कामासाठी पैसे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याप्रकरणी न्याय देण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांची भेट घेवून केली. तसेच पालकमंत्र्याचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले. उद्या २० जुलै रोजी हे शेतकरी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून आपली व्यथा मांडणार आहेत.