जिल्ह्यात शेतकरी संप सुरूच
By admin | Published: June 9, 2017 02:06 AM2017-06-09T02:06:55+5:302017-06-09T02:06:55+5:30
कर्जमाफी व इतर मागण्यांकरिता सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप वर्धेत सुरूच असल्याचे आठव्या दिवशीही दिसून आले.
समुद्रपूर व अल्लीपुरात रस्त्यावर दूध टाकून फेकला भाजीपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर/अल्लीपूर : कर्जमाफी व इतर मागण्यांकरिता सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप वर्धेत सुरूच असल्याचे आठव्या दिवशीही दिसून आले. गुरुवारी समुद्रपूर येथे प्रहार जनशक्ती पार्टी तर अल्लीपूर येथे शेतकरी भूमिपूत्र समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी रस्त्यावर दूध टाकून भाजीपाला फेकण्यात आला. या संपात परिसरतील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करण्यात आली.
अलमडोहच्या आठवडी बाजारात आंदोलन
शेतकरी भूमिपुत्र समितीद्वारे रॅली काढत आठवडी बाजार येथे शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून अलमडोह येथील धोटे महाराज यांचा दुधाने अभिषेक करण्यात आला. यानंतर रस्त्यावर निदर्शने देत भाजीपाला टमाटर फेकून निषेध नोंदविण्यात आला.
कर्जमाफी झाली पाहिजे या घोषणा देत माजी सरपंच गजू नरड, उपसरपंच विजय कवडे, मानवाधिकारचे अध्यक्ष उत्तम ढगे, ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे, पांडुरंग ढगे, धनंजय कोमूजवार, संजय गावंडे, गोलू साखरकर, सचिन पारसडे, विशाल साखरकर, विक्की साखरकर, शरद लिचडे, समीर शेख, विजय जयपूरकर, सूरज बगवे, भोजराज नरड, नरेंद्र वंजारी, विजय शिवनकर, नितीन सेलकर, मयुर डफ, प्रवीण गाठे, विकास गोठे, शुभम थुटे यांच्या उपस्थितीत गावातून रॅली काढली होती. या रॅलीचे आयोजन सतीश काळे यांनी केले होते.