निसर्ग कोपानंतर आता महावितरणचा शेतकऱ्यांवर कोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 04:00 PM2021-10-21T16:00:45+5:302021-10-21T18:23:26+5:30
महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरणही कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.
वर्धा : खरीप हंगामातील पीक गेल्याने रब्बी हंगामाची आशा बाळगून असलेले शेतकरी रब्बी पिकांच्या तयारीला लागलेले असताना दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्यांना रात्रभर ओलीत करावी लागत आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर काम करून थकल्यानंतर ओलितासाठी जागावे लागत आहे.
कारंजा (घाडगे) तालुक्यात सतत दुसऱ्या वर्षी भयंकर दुष्काळाचे सावट पसरले असून, सततच्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन देखील होणे कठीणच झाले आहे. तसेच कपाशीचे पीक लाल पडले असून लागलेला खर्च तरी निघेल या अपेक्षेने रात्रभर ओलीत करून कापूस जगविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यातच महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरण शेतकऱ्यांवर कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहे.
मागील वर्षी रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरवठा होत होता. तेव्हा सकाळचे दोन तास तरी मिळत होते. यावर्षी महावितरणने वीजपुरवठ्याचा नियम बदलविल्याने अख्खी रात्रच शेतकऱ्यांना अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यामुळे रात्रीच वीजपुरवठा करायचा असेल तर मागील वर्षीप्रमाणे करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही बाब कशी लक्षात येत नाही. हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा महावितरणने अंत पाहू नये, अन्यथा फार मोठे दुष्परिणाम महावितरणला भोगावे लागतील. मागील वर्षीप्रमाणे वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
हरिचंद चौधरी, शेतकरी, बोंदरठाणा