शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:45 PM2018-02-21T23:45:51+5:302018-02-21T23:46:10+5:30
पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते. येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा हा खडतर प्रवास आता संपुष्टात येणार आहे. आ.डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे धाम नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी शासनाने ६ कोटी २७ लक्ष ७० हजार रूपयांची तरतुद केली असून पुलाच्या बांधकामासंदर्भात लवकरच प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
पवनार व वाहीतपूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धाम नदीच्या तिरावर आहेत. शेतात जाण्यासाठी त्यांना नदी ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. येथील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. आ. भोयर यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली. सरपंच अजय गांडोळे यांनीही आमदारांकडे पाठपुरावा करून या प्रश्नाचे प्रत्यक्ष विदारक रूप त्यांना दाखविले. यावर आ.भोयर यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड अंतर्गत ६ कोटी २८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धाम नदीवर पूल साकारणार असून पवनार, वाहितपूर ही दोन गावेही एकमेकांशी जोडल्या जाणार. सोबतच या दोन्ही गावांचा परिसरातील मोर्चापूर, सुकळी स्टेशन, जयपूर, कुटकी व अन्य गावांशी जवळचा संपर्क होणार आहे. आवागमन करण्याचे अंतरही कमी होणार आहे. पुलासोबतच पोचमार्गाचे कामही या अंतर्गत होणार आहे. पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे पत्र आ. डॉ. भोयर यांनी सरपंच अजय गांडोळे व गावकऱ्यांना दिले. यावेळी वसंत उमाटे, अशोक भट, मुनाफ शेख, डॉ. अशोक हिवरे, चिंतामण उमाटे, गजानन गोमासे, बारसीराम मानोले, शंकर वाघमारे, माणिक सहारे व नागरिक उपस्थित होते.
पुलासह पोचमार्गाची होणार निर्मिती
पावसाळ्यात सुध्दा शेतकरी व शेतमजूर पीक फुलविण्यासाठी जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून प्रवास करतात. नदीला पूर असल्यास शेतकऱ्यांना अनेकदा शेतात जाणेही शक्य नव्हते. जा जीवघेणा संघर्ष अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. पुलाचा बांधकामाने तो संपुष्टात येईल.
सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चय केला. मागील ३० वर्षांपासून हा प्रश्न कोणीच सोडवू शकले नाही. ही समस्या मार्गी लावण्याचा चंगच बांधला. त्यासाठी आ. भोयर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. आमदारांनी हा प्रश्न सोडवूच असे वचन दिले. आज या वचनाची पुर्ती झाली.
- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.