वैरणासाठी शेतकऱ्यांची धडपड
By admin | Published: April 5, 2015 02:02 AM2015-04-05T02:02:53+5:302015-04-05T02:02:53+5:30
गव्हाची सवंगणी व मळणीच्या ऐन हंगामात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली़ यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांनी लगबगीने हार्वेस्टरच्या साह्याने मळणी ..
घोराड : गव्हाची सवंगणी व मळणीच्या ऐन हंगामात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली़ यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांनी लगबगीने हार्वेस्टरच्या साह्याने मळणी करून गहू घरी आणले़ यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला़ आता चाऱ्याचा प्रश्न निस्तारावा म्हणून शेतकरी धडपडत आहे़ हार्वेस्टरमधून पडलेल्या गव्हाच्या कांड्या उचलून गव्हांश तयार करण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसताहेत़
हार्वेस्टरने झटपट मळणी होत असली तरी शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या जनावरांना मिळणारा गव्हांश नाहीसा होतो; पण यावर मात करीत शेतात गव्हाच्या ओंबीतील दाणा निघाल्यानंतर उरलेला भाग शेतात पडतो़ हेच उचलण्याच्या कामाला शेतकरी व शेतमजूर लागले आहेत़ याला पुन्हा हडंबाच्या साह्याने बारिक करून यापासून गव्हांश (गव्हांडा) तयार करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा खर्च करावा लागत असल्याचे दिसते़
जनावरांसाठी वर्षभराच्या चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्याला करून ठेवावी लागते़ यासाठी सोयाबीनपासून मिळणारे कुटार, गव्हापासून गव्हांश, मका व ज्वारीपासून कुटार करून भरून ठेवले जात होते. यामुळे जनावरांच्या वैरणाचा प्रश्न सुटत होता. अलिकडे झटपट कापणी व मळणीचे दिवस आले असून अशा वैरणासाठी शहरातील गोपालक ग्रामीण भागात वैरण खरेदीसाठी भटकंती करताना दिसत आहेत़ हार्वेस्टरमुळे वैरणाचा प्रश्न निर्माण होत असताना यावरही शेतकरी मात करीत असल्याचे दिसून येते़ सध्या तालुक्यातील शेतकरी शेतातील गव्हाच्या कांड्या वेचण्यात व्यस्त असून गुरांच्या चाऱ्याची तजविज करून ठेवताना दिसतात़ यामुळे वैरण टंचाईची धग जाणवत नसल्याचेच दिसून येते़(वार्ताहर)
टंचाईवर मात करण्यासाठी नवोपक्रम
यंत्रांच्या साह्याने पिकांची सवंगणी केली जात असल्याने गुरांकरिता चारा राहत नाही़ यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होताना दिसतो; पण तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावरही मात केली आहे़ शेतकऱ्यांनी हार्वेस्टरद्वारे गव्हाची सवंगणी केली़ यात शेतात गव्हाच्या कांड्या विखुरलेल्या आहेत़ या गव्हाच्या कांड्या गोळा करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त झाल्याचे दिसते़
शेतातील गव्हाच्या कांड्या गोळा करून त्या पुन्हा थ्रेशरमध्ये बारिक करून जनावरांकरिता गव्हांडा मिळविला जात असल्याचे दिसून येत आहे़ यामुळे गुरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत नाही़ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हा नवोपक्रम हाती घेतला असून खर्च मात्र करावा लागत आहे़