शेतकऱ्यांना लागली कापूस, सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:46 PM2024-11-06T16:46:21+5:302024-11-06T16:47:25+5:30
अल्प दरात करावी लागतेय विक्री : लागवड खर्च निघणेही कठीण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. हमी भावापेक्षा ही कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतमालाला असाच भाव मिळत राहिल्यास शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखीच वाढण्याची भीती आहे. कापसाचा हमी दर ७ हजार ४२१ रुपये आहे. प्रत्यक्षात साडेसहा हजारांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर वाढत नसल्याने घरातच पडून आहे. सोयाबीन, कापूस आदी शेतमालाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. दर कमी असतानाही शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना सावकाराचे आणि कृषी केंद्रातून घेतलेल्या साहित्याचे पैसे चुकता करायचे आहे. वेळेवर रकमा चुकता न केल्यास व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. याच कारणातून शेतकरी माल विकत आहे. आज शेतमालास जो भाव मिळत आहे. त्यातून लागवडीकरिता लागलेला खर्चही भरुन निघणे कठीण आहे. मागील दशकापासून कापूस, सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या दरात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. इतर वस्तूंच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. कृषी निविष्ठा खत, बी- बियाणे आणि मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मध्यंतरी सोयाबीन, कपाशीला चांगला भाव मिळाला, मात्र त्यात सातत्य राहिले नाहीत. लगेच भाव गडगडले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या प्रमाणात शेतमालाच्या दरात वाढ का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. घरात आलेला शेतमाल बाजारात विकण्याकरिता नेण्यासाठी वाहतुकीचाही खर्च लागतो. या खर्चातही यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामासाठी मजुरीही उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे.
नाफेडने सोयाबीनची खरेदी करावी
सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने नाफेड मार्फत खरेदी सुरु करावी. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकरी विविध बाजूने अडचणीत आला आहे. होणाऱ्या पिळव- णुकीमुळे शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. त्यामुळे नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी करण्याची मागणी होत आहे.
दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे माल नसतो
शेतमालाचे दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमाल नसतो हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. काही वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही. व्यापाऱ्यांनाच या मोठा फायदा होत गेला आहे. उत्पादन खर्च वाढत जातो. विविध साहित्याच्या किमती, मजुरीच्या वाढत्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परंतु वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही.