शेतकरी धडकले तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:17+5:30
एक महिण्यांपासून पावसाने कहर केल्यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्राथमिक सर्व्हेक्षण केले नाही. याविरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी उद्या येण्याचे आश्वासन दिल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : एक महिण्यांपासून पावसाने कहर केल्यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्राथमिक सर्व्हेक्षण केले नाही. याविरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी उद्या येण्याचे आश्वासन दिल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
माहे सप्टेंबर महिण्यात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तुर, संत्रा, मोसंबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविणे क्रमप्राप्त होते. मात्र सप्टेंबर महिण्यात केवळ एका दिवसाच्या पावसाने शेतातील झालेल्या नुकसानीचा त्रोटक सर्व्हे पाठवून शासनाची दिशाभूल केली. हा अन्याय असुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. असा आरोप करीत सामाजीक कार्यकर्ते राजेश ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी सडलेले कपाशीचे बोंड, सोयाबीन तालुका कृषी अधिकारी यांच्या टेबलवर टाकले. याचा जाब विचारला यावेळी तालुका कृषी अधिकारी एम.जे.तोडकर यांनी शासनाचे आदेश आल्यावरच सर्व्हे केला जाईल असे सांगितले. त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी सतीश सांगळे यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून माहीती दिली. त्यांनी उद्या अंतोरा व लहान आर्वी परिसरातील गावांना भेटी देण्याचे मान्य केले. यावेळी तहसिलदार आशीष वानखडे यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे, बेलोरा सरपंच मिलींद जाणे, मानीकनगर येथील उपसरंपच देविदास पाथरे, डॉ.राजेंद्र जाने, नामदेव झामडे, गजानन भोरे, चेतन मोहोड, प्रशांत पांडे, अजय लोखंडे, मनोज आंबेकर, उमेश आंबेकर, हनुमंत कुरवाडे, आशिष वाघ यांच्यासह तालुक्यातील शेतकरी हजर होते. शासनाने पीक नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ आर्थीक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या महसूल यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे.