शेतकऱ्याची लेक ‘देवयानी’ जिल्ह्यातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 05:00 AM2022-06-18T05:00:00+5:302022-06-18T05:00:23+5:30
परीक्षेत आष्टीच्या राष्ट्रीय हुतात्मा विद्यालयाची देवयानी देविदास इखार हिने ९९.२० टक्के गुण संपादित करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर आर्वीच्या कृषक इंग्लिश हायस्कूलचा घननिळ कुसुमाकर शिरपूरकर याने ९८.४० टक्के तर आर्वीच्याच कृषक इंग्लिश हायस्कूलच्या कौस्तुभ हरिभाऊ चरपे याने ९८.२० टक्के गुण संपादित केल्याने ते जिल्ह्यातून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत आष्टीच्या राष्ट्रीय हुतात्मा विद्यालयाची देवयानी देविदास इखार हिने ९९.२० टक्के गुण संपादित करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
तर आर्वीच्या कृषक इंग्लिश हायस्कूलचा घननिळ कुसुमाकर शिरपूरकर याने ९८.४० टक्के तर आर्वीच्याच कृषक इंग्लिश हायस्कूलच्या कौस्तुभ हरिभाऊ चरपे याने ९८.२० टक्के गुण संपादित केल्याने ते जिल्ह्यातून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले. कोविडचा जोर बऱ्यापैकी ओसरल्याने कोविड संकट काळात विशेष दक्षता घेत दहावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्ह्यातील १६ हजार १६२ विद्यार्थ्यानी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यात ८ हजार ५२७ मुले तर ७ हजार ६३५ मुलींचा समावेश होता. त्यापैकी १६ हजार १३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ९६६ मुले तर ७ हजार ४२६ मुलींचा समावेश आहे. एकूणच यंदा दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
देवयानीला व्हायचंय डॉक्टर
n माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९९.२० टक्के गुण संपादित करून वर्धा जिल्ह्यातून पहिला येण्याचा बहुमान पटकाविणाऱ्या आष्टीच्या राष्ट्रीय हुतात्मा विद्यालयाच्या देवयानी देवीदास इखार हिला विज्ञान शाखेचे शिक्षण घेत डॉक्टर व्हायचे आहे. देवयानीचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, आई गृहिणी आहे. आई देवयानीच्या वडिलांना शेतीच्या विविध कामांमध्येही मदत करते.
n देवयानीच्या भावाने बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले होते. त्यामुळे आपणही दहावीत घवघवीत यश संपादित करू, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिने अभ्यासाबाबतचे सूक्ष्म नियोजन करून त्यावर कृती केली. वडिलांकडे केवळ दीड एकर शेती असल्याने देवयानीच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक अडचणींना नेहमीच तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत मामाकडून मिळणारी मदत देवयानीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी फायद्याचीच ठरत आहे. ग्रामीण भागात अजूनही पाहिजे तशा आरोग्य सुविधा नसल्याने डॉक्टर होत ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा करण्याचा मानस देवयानी हिचा आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह शिक्षकांना दिले आहे.