फेडरेशनच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:10 AM2019-01-16T00:10:39+5:302019-01-16T00:11:37+5:30
जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सीसीआयच्या सहा केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी झाली असली तरी फेडरेशनच्या केंद्रावर साधा एक क्विंटलही कापूस खरेदी झाला नसल्याचे वास्तव आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सीसीआयच्या सहा केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी झाली असली तरी फेडरेशनच्या केंद्रावर साधा एक क्विंटलही कापूस खरेदी झाला नसल्याचे वास्तव आहे. तर या दोन्ही शासकीय खरेदी केंद्रांना मागे सोडत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींनी यंदाही मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे.
मागील वर्षी आणि यंदा सुरूवातीला जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने चांगलेच थैमान घातले. यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भरही पडली. शिवाय पावसाने वेळीच दगा दिल्याने त्याचा फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. अशा विदारक परिस्थितीला तोंड देत शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकाचे संगोपन करण्यासाठी जीवाचे राणच केले. परंतु, सध्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अतिशय अल्प दर कापसाला मिळत असल्याची ओरड शेतकºयांकडून होत आहे.
जिल्ह्यात खरांगणा, वायगाव, देवळी, सेलू, सिंदी व हिंगणघाट येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रांवर यंदाच्या हंगामात १४ जानेवारीपर्यंत एकूण केवळ ५ हजार ७५६ क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर फेडरेशनच्या जाम आणि तळेगाव या दोन केंद्रावर अद्याप एकही क्विंटल कापसाची आवक झाली नसल्याचे सांगण्यात आले. सीसीआयकडून सध्या कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये भाव दिल्या जात आहे, हे उल्लेखनिय.
७ लाख ९४ हजार क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी
यंदाच्या हंगामात १४ आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७,९४,३८३ क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे. त्यात सीसीआच्या सहा केंद्रांवरील ५ हजार ७५६ तर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी झालेल्या ७ लाख ८८ हजार ६२७ क्विंटल कापसाचा समावेश आहे.
कोरडवाहू शेतजमिनींवरील कापसाची झाली उलंगवाडी
यंदा पावसाच्या अनियमिततेचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यातून शेतकरी सावरत नाहीच तो गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसून आला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या उपाययोजना यंदा कपाशी उत्पादकांसाठी फायद्याच्या ठरल्या. शिवाय वेळोवेळी पिकाची निगा घेतल्याने कपाशीच्या पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. सध्यास्थितीत बहूतांश कोरडवाहू शेतजमिनीवरील कपाशीच्या पिकाची उलंगवाडी झाल्याचे दिसून येते. शिवाय कपाशी उत्पादकांनी भाव वाढीच्या आशेवर पिकविलेला कापूस घरीच ठेवल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडेही कापूस कमी आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत कापसाला शासकीय केंद्राच्या तुलनेत व्यापाऱ्यांकडून आधारभूत किंमतीपेक्षा जास्त भाव दिला जात होता. म्हणूनच शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे गेला नाही. शिवाय व्यापारी झटपट कापसाचा चुकारा देत असल्याने व शासनाकडून चुकारा देण्यासाठी वेळ लागत असल्यानेही शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे वळला नसल्याचे दिसून येते.
- अॅड. सुधीर कोठारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट.