आगीत शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान
By admin | Published: June 10, 2015 02:17 AM2015-06-10T02:17:39+5:302015-06-10T02:19:07+5:30
येथील गौरक्षण परिसरातील शेतकरी कमलाकर शंकर खोटोळे यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली.
पुलगाव : येथील गौरक्षण परिसरातील शेतकरी कमलाकर शंकर खोटोळे यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत गोठ्यात बांधलेला एक बैल व दोन गोऱ्ह्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा गाई गंभीररित्या होरपळल्या. त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. या आगीत शेतीच्या साहित्यासह पाच लाख रुपयांचे साहित्य खाक झाले.
शहर झोपेत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास गोठ्याला आग लागली. रात्री वारा असल्यामुळे आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. गुरांच्या हंबरड्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले असता आगीची घटना उघड झाली. घटनेची माहिती लगेच पोलीस प्रशानाला देण्यात आली. यात नगरपरिषद व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यातही केंद्रीय दारूगोळा भांडाराचे अग्निशामन दल विलंबाने घटनास्थळी पोहचले. अग्निशामन दल पोहचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंत तीन जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते.
या आगीत शेतीची अवजारे, स्प्रिंकलर पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले. सतत होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त व कर्जबाजारी होत आहेत. अश्यातच खोटोळे यांच्यावर आलेल्या या सकंटामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.
जि.प.च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या समक्ष पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. यात सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नाविण्यपूर्ण योजनेतून मदत करण्याची ग्वाहीही अग्रवाल यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)