शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

By admin | Published: April 30, 2017 01:04 AM2017-04-30T01:04:41+5:302017-04-30T01:04:41+5:30

स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, ...

A farmer's meeting for rent and debt relief to the farmer | शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

Next

तहसीलदारांना निवेदन : सावकारांना बेड्या ठोकण्याची मागणी
हिंगणघाट : स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था करावी. सर्व शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करून सात-बारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर किसान सभेद्वारे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार यादव व उपविभागीय अधिकारी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
सावकारीच्या पैशात शेताची विक्री करून घेऊन शेती हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकारांना बेड्या ठोका. वहिवाटदार म्हणून शेताच्या सात-बारावर नोंद घेण्याची सर्व प्रकरणे निकाली काढावी. सिलींग जमिनीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील गोविंदपूरचे प्रकरण त्वरित निकाली काढावे, आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात यशवंत झाडे, जगन चांभारे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, भास्कर डवरे, प्रशांत चरडे, गजानन काळे, देवेंद्र शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, रामभाऊ खेलकर, विनोद दातारकर आदंचा समावेश होता. यावेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती मागण्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
राज्य उपाध्यक्ष झाडे यांनी जगाला जगविणारा, धान्य पिकविणारा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो. दरवर्षी ५ हजारांहून अधिक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात. या आत्महत्यांचे सत्र आता त्यांच्या कुटुंबात मुला-मुलींपर्यंत पोहोचले आहे; पण राज्य व केंद्र शासनाला याची चिंता नाही. आम्हाला दिल्ली-मुंबईच्या तक्तावर बसवा, राज्य द्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे पूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजपला त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
सत्तेसाठी सर्व काही, ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ असा अनुभव शेतकरी भाजपाच्या राज्यात घेत असल्याचे दिसते. दोघांच्याही राज्यात शेतकरी आत्महत्या व शेतमाल लुटीची प्रक्रिया सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन संघर्ष करावा व न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी चंद्रभान नाखले, जानराव नागमोते, संजय भगत, पांडुरंग राऊत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जगन चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत चरडे यांनी मानले.
धरणे आंदोलनामध्ये किसान सभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा व आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्ती राखुंडे, प्रफुल लढी, निलेश चरडे, श्रीकृष्ण बावणे, विनोद नगराळे, गुलाब घाटे, बाबाराव वैरागडे, कवडू मेश्राम आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: A farmer's meeting for rent and debt relief to the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.