शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:58 PM2018-11-03T21:58:31+5:302018-11-03T21:58:58+5:30
राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत) : राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. व मोर्चातील शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, निलेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नयनसुख लढ्ढा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर विविध वक्तयांनी मनोगत व्यक्त केले. आणि मोर्चाचा समारोप झाला. शेतातील ओलिताकरिता आठवड्यातील सात दिवस आठ तास वीजपुरवठा दिवसा करावा, बोंडअळीच्या मदतीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावे, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाच्या १४ जून २०१८ च्या जीआर नुसार जाहीर केलेले. १००० रुपये प्रतिक्विंटल बोनस तत्काळ द्यावे, २०१८-१९ या हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करुन शासनाने हमीभावाने खरेदी त्वरित सुरू करावी, कृषीपंप वीजजोडणीकरिता सहा महिन्यांआधी ज्या शेतकऱ्यांनी डिमांडनोटनुसार रकमेचा भरणा वीजवितरणकडे केला. त्या शेतकऱ्यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी. तळेगाव, चिस्तुर, आनंदवाडी, भारसवाडा, टेकोडा, बेलोरा आणि खडका या गावांची कृषीपंप व गावठाण वीज जोडणी एकाच लाईनवर असल्याने ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले आहे. या गावांची कृषीपंप व गावठाण लाईन वेगळी करण्यात यावी, आदी मागण्याकरिता शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या आक्रोश मोर्चा दरम्यान शेतकरी महामार्गावर चक्काजाम करू शकतात या भितीमुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येत शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यामध्ये ज्या ज्या विभागाशी निगडित शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या- त्या विभागाचे सर्व अधिकारी, सिंचन विभाग, महावितरण, सहकार विभाग, वनविभागाशी निगडित असलेले सर्व अधिकारी हे यावेळी निवेदन स्वीकारण्यास मोर्चा स्थळी हजर होते.
या आंदोलनात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी यात सहभागी झाले होते. या मोर्चाला निलेश देशमुख, शैलेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी यावेळी मांडल्या.