कापसाच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:00 AM2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:00:47+5:30
यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून हा सर्वांत जास्त दर ठरला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आंतरराष्ट्रीय बाजारात रुई आणि सरकीच्या दरात वाढ झाल्याने विदर्भाच्या बाजारात कापसाला नऊ हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा अडीच हजार रुपयांहून अधिकचा दर क्विंटलमागे मिळत आहे. शेतकऱ्यांना दरवाढ दिलासा देणारी ठरली आहे.
आर्वीची बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे इंग्रजांच्या ब्रिटिश काळात येथील कापूस नेण्यासाठी इंग्रजांनी आर्वी-पुलगाव शकुंतला गाडी १९१७ मध्ये सुरू केली होती. येथून हा कापूस पुलगावला आणि तिथून रेल्वेने हा कापूस कोलकात्याला जायचा आणि कोलकात्यावरून हा कापूस इंग्रज आपल्या देशात घेऊन जायचे. आजही विदर्भातील प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते.
यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून हा सर्वांत जास्त दर ठरला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टीने पिकांना जबर फटका बसला होता. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामुळे बोंडे सडली होती, जी काही कपाशी बचावली त्यातून उत्पादन सुरू होते. त्यानंतर पुन्हा शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला.
जिल्ह्यात यंदा कापसाचे उत्पादनात घट झाली आहे व इतर ठिकाणीही कपाशीला पावसाचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर्षी कापूस उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट झाली आहे, त्यामुळे कापसाला सर्वाधिक दर मिळत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्वी विभागात १८ जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत, तर कापूस खरेदी करणारे ३० ते ३५ व्यावसायिक असल्याने कपसाचीही आवक वाढली आहे.
सध्या तरी कापसाचा मिळणारा भाव समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; पण भाव पुन्हा वाढणार, की कमी होणार, हे सांगणे कठीण आहे.
रामभाऊ केणे,शेतकरी