शेतकरी संपाची धग कायम

By admin | Published: June 7, 2017 12:30 AM2017-06-07T00:30:36+5:302017-06-07T00:30:36+5:30

कर्जमुक्ती आणि ५० टक्के नफ्यासह हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धग जिल्ह्यात कायम आहे.

The farmers remained in the shadow of the strike | शेतकरी संपाची धग कायम

शेतकरी संपाची धग कायम

Next

सहावा दिवस : बंद पाळून रस्त्यावर दूध-भाजी फेकून संताप व्यक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कर्जमुक्ती आणि ५० टक्के नफ्यासह हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धग जिल्ह्यात कायम आहे. मंगळवारी आंजी (मोठी) येथे बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी आंजी बंदचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांसह संघटनांनी दूध रस्त्यावर ओतत भाजीपाला फेकला. याप्रसंगी खा. रामदास तडस यांना निवेदनही देण्यात आले. शिवाय भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने सावली (सास्ताबाद) व तरोडा येथे रस्ता रोको केला तर विरूळ व बरबडी येथे शेतकरी संघटनेने तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकले. मांडगाव येथे मुंडन करून निषेध नोंदविला. समुद्रपूर येथे विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने संपात उडी घेत तहसीलदारला निवेदन सदर केले. तर वर्धेत एसएफआयने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आंजी (मोठी) येथील बसस्थानक चौकात शेतकरी संघटना व इतर सहकारी पक्ष, संघटनांद्वारे आंजी बंदचे आवाहन केले. बसस्थानक चौकात शेतकरी संघटनेचे शंकर बावणकर व पं.स. सदस्य राजेंद्र डोळसकर यांच्या नेतृत्वात शेतकरी एकत्रित झाले. गावातील प्रमुख मार्गाने फिरत बाजारपेठ बंद करण्यात आली. बाजार चौकात खा. रामदास तडस यांना घेराव करून निवेदनही देण्यात आले. खा. तडस यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यानंतर बसस्थानक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला कांदे, आलू, कोबी या भाज्यांचा हार घालण्यात आला. यावेळी सुरेश खेडकर, राजेंद्र डोळसकर, माधव चोरे, इंद्रजीत बत्रा, रूपराव मोरे, मनोहर राऊत, गजानन कडू, कमलेश उईके, गुलजार पठाण, सरपंच राकेश भूतडा, लक्ष्मण कोंडलकर, गफार शहा, उमेश पुरी, जगदीश बत्रा, नरेश धोंगडी, चंद्रशेखर मंगरूळकर, आंजी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरांगण्याचे ठाणेदार प्रशांत पांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आर्वी तालुक्यातील सोरटा, विरूळ येथील तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम, सोरटाचे उपसरपंच मंगेश मानकर, रामभाऊ कुंभारे, गजानन खालखोने, सतीश दानी, मंगेश गव्हार्ले, रामभाऊ तुपकरी, अमर आकुडकर, वासुदेव गेटमे, अंकुश मुंडेकर, प्रशांत शरदकार, प्रभाकर मोहेकर आदी उपस्थित होते.
भूमिपुत्र संघर्ष वहिनीच्यावतीने तरोडा, सावली (सास्ताबाद) येथील शेतकऱ्यांच्या सहकार्याने तरोडा व सावलीच्या बस स्थानकावर रस्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून भाजप शासनाचा निषेध नोंदविला. भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात सुमारे ७० शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
समुद्रपूर तालुक्यातील बरबडी येथील शेतकऱ्यांनीही तलाठी कार्यालयाला टाळे लावत शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी शेतकरी जयंत तिजारे, प्रमोद वांदिले, गणपत भारती, मोहन केमये, चंदु पेरकुडे, सचिन वांदिले, बालु तायवाडे, प्रफुल्ल घोड़े, युवराज घोडे, महेन्द्र पेरकुडे, दिगांबर चदंनखेडे, गुलाब वांदिले, राजु चौधरी, कान्हा घोडे, अभय झाडे, राहुल वानखेडे, संदीप कुटे, सचिन पेरकुडे, शुभम तिजारे, संकेत अवचट याच्यासह शेतकरी उपस्थित होते.
मांडगाव येथील बस स्थानक चौकात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध व भाजीपाला फेकून तसेच मुंडन करून सरकार विरोधात रोष व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्याचा मनसुबा पोलिसांच्या हस्तक्षेपाने बारगळला. प्रारंभी शेतकरी हेमंत पाहुणे यांनी मुंडन केले. या आंदोलनात गुणवंत पाहुणे, मनोज चंदनखेडे, विक्की पिसे, अंकित दांडेकर, स्वप्नील देशमुख, गजानन पाहुणे, रवींद्र कोळसे, भूषण पाहुणे, अतुल वांदिले, नितीन वाटकर, प्रमोद बोरकर यांनी आंदोलन केले.
विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने संपात उडी घेत समुद्रपूर तहसीलदारला निवेदन सदर केले. यावेळी आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, अजय मुडे, शेतकरी संघटनेचे डॉ. हेमंत इसनकर, महेश माकडे, राजू सोेंगे, गोकुल पाटील, शेखर तेलतुंबडे, अजय पानेकर, दिनेश वाघ, शेखर तेलतुंबडे, केशव भोले, शेषराव तुळणकर, सुनील हिवसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवारी आर्वी बंदचे आवाहन
शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता सुरू असलेल्या संपाला पाठींबा म्हणून बुधवारी प्रहार सोशल फोरम व परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने आर्वी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये परिसरातील व्यापाऱ्यांनी सहभागी होत आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी संपाचा आज सहावा दिवपस असून संपाची धग कायम असल्याने शेतकऱ्यांचा हा संप अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे.
 

Web Title: The farmers remained in the shadow of the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.