नंदोरी येथे शेतकऱ्यांचा रस्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:10 AM2018-06-13T00:10:13+5:302018-06-13T00:10:13+5:30
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी चौकात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता प्रहार पक्षाच्यावतीने सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदोरी : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी चौकात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता प्रहार पक्षाच्यावतीने सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी हायमास्ट लाईट व आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली.
आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेले गतिरोधक पुर्णत: सपाट झाले आहेत. नेहमीच येथे अपघात होत असतात. गत पंधरवड्यातच या ठिकाणी नंदोरीतील एका युवकाचा भरधाव कारने बळी घेतला. सदर ठिकाणाहून जड तथा कार व इतर वाहने भरधाव ये-जा करीत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. शिवाय या परिसरात रात्रीच्या सुमारास काळोख राहत असल्याने येथे हायमास्ट लावण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ही मागणी आताचीच नव्हे तर सदर मागणीचे निवदेन यापूर्वी म्हणजे २९ मे रोजी समुद्रपूरच्या तहसीलदारांना देण्यात आले. परंतु, त्यांनीही मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी सदर आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. नंदोरी चौकात करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनादरम्यान नंदोरी चौकात आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे तसेच हा परिसर प्रकाशमान राहावा यासाठी चौकात आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट लावण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांसह ठाणेदारांना सादर करण्यात आले.
सदर निवेदन महादूरे व मंडळ अधिकारी चौधरी यांनी स्विकारले. आंदोलनात देवा धोटे, खेमलाल झगराह, चिंतामण धोटे, सतीश पिठाडे, प्रवीण बोरुटकर, सुधाकर साटोणे, प्रवीण जायजे, अमीत धुमाळ, बंटी पंचोडबरीया, सुरेश शंभरकर आदी सहभागी झाले होते.