शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:34 PM2018-02-14T22:34:50+5:302018-02-14T22:35:28+5:30
निव्वळ शेती ही सध्या शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने त्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा करावा. जोडधंद्यांतून मिळणारे नियमित उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करू शकते.
ऑनलाईन लोकमत
केळझर : निव्वळ शेती ही सध्या शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने त्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा करावा. जोडधंद्यांतून मिळणारे नियमित उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करू शकते. शेतकऱ्यांनी शेतीच्या २० टक्के सिंचन क्षेत्रात कपाशी या पिका व्यतिरिक्त ऊस, तूती यासारखे अन्य पीक घ्यावे. दलालांमुळे शेतीपिकांना योग्य भाव मिळत नाही. हमी भाव पाहिजे असेल तर शेतमालाची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे. शेतीवरील उत्पादन खर्च कमी केल्यास शेती करणे परवडणारी ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जय किसान स्वयं सहाय्यता बचत गटाच्यावतीने सुरू केलेल्या दाल मिलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्थानिक आर. सी. एफ. च्या गोदामामध्ये सुरू करण्यात आलेल्या दालमिलचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य विनोद लाखे, तहसीलदार महेंद्र सोनवणे, तालुका कृषी अधिकारी वाघमारे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक राईकवार, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फारूख शेख, बचत गटाचे अध्यक्ष शांताराम तेलरांधे आदींची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्ह्यात पांदन रस्ते मोकळे करून देण्याचे काम सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांनी २५ टक्के रक्कम भरल्यास ७५ टक्के रक्कम शासन खर्च करणार आहे. शिवाय शेतकरी गटांनी त्यांच्या गावात टूल बँक सुरू करावी. शेतकºयांनी नैसर्गिक शेती करावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी केले. ही दालमिल केळझर व परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांना फायद्याची ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक लक्ष्मीकांत वन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय किसान स्वयं सहाय्यता बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रर्त्यांनी सहकार्य केले.