शेतकरी समृद्ध झाला पाहिजे

By admin | Published: May 7, 2017 12:40 AM2017-05-07T00:40:07+5:302017-05-07T00:40:07+5:30

मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे.

Farmers should be prosperous | शेतकरी समृद्ध झाला पाहिजे

शेतकरी समृद्ध झाला पाहिजे

Next

देवेंद्र फडणवीस : आर्वी शहर स्वच्छ करण्याचा संकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व मार्केट वाढविण्याच्या दृष्टीने सरकारचे सकारात्मक पाऊल राहणार आहे. शेतकरी उत्पादन वाढवून समृद्ध झाला पाहिजे, हाच विचार घेऊन आमची वाटचाल सुरू आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
शुकवारी पं.स. सभागृहातील आढावा बैठकीनंतर माजी आमदार दादाराव केचे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांत शेतकरी संकटात सापडला; पण यावर्षी महाराष्ट्रात बारा टक्के उत्पादन वाढून ४० हजार कोटीने शेतपिकांचे उत्पादन वाढले आहे. पुढच्या अडीच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल व शेती सुक्ष्म सिंचनातून कशी विकसित करता येईल, याबाबत ठोस पावले उचलणे सुरू आहे. आतापर्यंत शासनाने शहर स्वच्छ करण्यासाठी २१ हजार कोटी रुपये दिले. शहर स्वच्छ झाले तर रोजगार वाढतील. त्यासाठी आर्वी पालिकेने सर्वप्रथम शहर स्वच्छ करणे, सांडपाण्याचे काम व त्या पाण्याचे नियोजन या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, ते अग्रक्रमाने करण्यात येईल, असेही सांगितले. आर्वी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतून तयार झालेल्या सुक्ष्म सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या ९ हजार एकर शेताला सिंचन होऊन उत्पादन वाढेल, असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला.
माजी आमदार केचे यांनी आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाची समस्या, आर्वीत एमआयडीसीची गरज व इतर समस्या मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावाव्या, असे सांगत आर्वी शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचा उल्लेख केला. यावेळी खा. रामदास तडस, माजी खासदार विजय मुडे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, जि.प. समाज कल्याण सभापती निता गजाम, सोनाली कलोडे मुकेश भिसे, कांचन नांदुरकर, युवराज ढोल, सुरेश खवशी, आर्वी न.प. उपाध्यक्ष पल्लवी काळे, वसंत भांगे, मुकूंद बारंगे, दाऊदी बोहरा व मुस्लीम समाजाचे पदाधिकारी, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील जि.प., पं.स. व नगर पंचायत सदस्य, तालुक्याचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार गजानन भोरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त समिती, सर्कसपूर ग्रामस्थ, अंशकालीन कर्मचारी संघटना, निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत समस्यांबाबत अवगत केले.

कार्यकर्त्यांचाही घेतला आढावा
आढावा बैठकीनंतर माजी आमदार केचे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी आपले सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करणार असल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या पोहोचविण्याचे आवाहन केले. आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते.

आर्वी उपविभागातील कारंजा येथील नगर पंचायतीला विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आर्वी विधानसभा संघाचे आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करीत राष्ट्रीय महामार्गावरील शहर आणि नगर पंचायत झालेले कारंजा विकास कामात कसे मागे राहिले, हे समजावून सांगितले. याप्रसंगी कारंजा शहरासह आर्वी विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व बाबी ऐकून घेत विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.
 

Web Title: Farmers should be prosperous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.