शेतकऱ्यांनी खताची बॅग आणि देयकावरील किंमत तपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:15 PM2018-05-22T22:15:40+5:302018-05-22T22:15:40+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना देयकावरील किंमत व खताच्या बॅगवरील किंमती तपासून घ्याव्या, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
यंदा राज्यात वेळेवर मान्सून येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून खत आणि बियाणे खरेदी सुरू झालाी आहे. गत हंगामात आलेल्या अनुभावावरून यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. तसाच प्रकार रासायनिक खतांच्या खरेदीत होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषी केंद्रात रब्बी हंगामातील खताचा साठा आहे. यात नवा साठा येणार आहे. या काळात शासनाच्यावतीने लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे खतांचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामुळे या दरात तफावत राहणार असल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने वर्तविला आहे.
यामुळे खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून मिळाणाऱ्या देयकात आणि मिळालेल्या खताच्या बॅगवरील किमती सारख्या असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करण्याच्या सूचना कृषी विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याला २२,५२० मेट्रीक टन खताची गरज
यंदाच्या खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. याकरिता शेतकºयांकडून नित्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर होणार आहे. जिल्ह्याला २२ हजार ५२० मेट्रीक टन खताची गरज असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यात युरिया ३६ हजार ५००, डिएपी ६ हजार ८६०, एमओपी ३ हजार आणि एसएसपी ६ हजार ९१५ मेट्रीक टन खताची गरज आहे. या व्यतिरिक्त इतर खतांची मागणी शेतकºयांकडून होणार आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बी-बियाणे आणि खतांचा साठा करण्यात येत आहे. यात कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत गंडा बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
- आर.पी. धर्माधिकारी, कृषी विकास अधिकारी, जि.प. वर्धा.