शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये
By admin | Published: November 11, 2016 01:55 AM2016-11-11T01:55:36+5:302016-11-11T01:55:36+5:30
कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही,
शैलेश नवाल : जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची बैठक
वर्धा : कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही, यासाठी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची बैठक जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी घेतली.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे याबाबत यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास शासनाने बंदी केली आहे. अडत व्यापाऱ्यांकडूनच घेण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिलेत.
कृषी उत्पन्नाचे वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी. वैद्यमापन शास्त्र निरिक्षकांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील वजनांची तपासणी करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. शेतकऱ्यांना सर्व कृषीमालाचे रोजचे दर माहित व्हावेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये डिजीटल बोर्ड लावावेत व त्यावर रोजचे दर प्रदर्शीत करावेत.
सेंद्रिय पध्दतीने उत्पादित कापसासाठी जास्त दर मिळेल यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सेंद्रीय कापसाचा वेगळा ढीग लावण्याची व्यवस्था करावी. सध्या २८ हजार शेतकरी सेंद्रिय पध्दीने कापूस उत्पादन करीत आहेत. आर्वी, सिंदी आणि हिंगणघाट येथे बीसीआय विक्री केंद्र सुरू करणार आहेत. आहे. याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. कृषी समन्वीत विकास प्रकल्प, महाराष्ट्र शासन आणि बजाज फांऊडेशन हे सेंद्रीय कापूस असल्याचे प्रमाणित करून देतील, अशी माहिती प्रणव पाटील यांनी दिली. या बैठकीला सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, जिल्हा उपनिबंधक जयंत तलमले, वैद्यमापन शास्त्र निरीक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी)