शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून खतांचे नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:16 PM2017-12-05T22:16:47+5:302017-12-05T22:17:04+5:30
मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधामंत्री स्वत: शेतकऱ्यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे लक्ष आहे हे अधोरेखीत करते.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधामंत्री स्वत: शेतकऱ्यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे लक्ष आहे हे अधोरेखीत करते. यापूर्वी कधीही मातीचे परीक्षण करण्यात आले नाही. या शासनाने ही योजना सुरू करून शेतकºयांच्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून घेत शेतीला आवश्यक मुलद्रव्याचा आहार पुरवावा आणि भरघोस उत्पन्न घ्यावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व मृदा दिनानिमत्त शेतकारी मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खा. रामदास तडस मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत उंबरकर, उपसंचालक जी. आर. कापसे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तालुका कृषी अधिकारी सांगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खासदार तडस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच पाणी आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने शेतीतून सोन पिकवू शकतो. विदर्भातील सिंचनाचे ३० वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी ७०० कोटी, शेतकºयांना आज मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम देशपातळीवर एकाचवेळी राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर झाला आहे. हा प्रश्न येत्या लोकसभेच्या अधिवेशनात आपण मांडू असे आश्वासन देत शेतकºयांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंद्याची साथ दिली पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकºयांनी आधुनिक शेतीसोबतच जैविक शेतीची कास धरावी. शेतीला जोडधंदा आणि फवारणी किटचा वापर करावा, असे आवाहन कृषी सभापती मुकेश भिसे यांनी याप्रसंगी केले.
शासन शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण करून देते. यासाठी प्रत्येक परीक्षणाला शासनाला ३०० रूपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे. जमिनीत काय आहे आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे याचे गणित या आरोग्य पत्रिकेत दिलेले असते. शेतकºयांनी त्याप्रमाणे खतांचा वापर करून उत्पादनात वाढ करून द्यावी. उत्पादन खर्च कमी करणे हे शेतकऱ्यांचे धोरण असल पाहिजे. त्यासाठी शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. घरगुती बियाणे, सेंद्रिय व जैविक खते आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करून शेतकºयांनी उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले. लोणी येथील शेतकरी पेठकर यांनी यावेळी सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले. यावेळी माती परीक्षण अधिकारी रश्मी जोशी, डॉ. रूपेश झाडोदे, डॉ. धनराज चौधरी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात शेतकºयांना मृत आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एकाचवेळी १९ हजार मृद आरोग्य पत्रिकेचे ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात आले. तसेच प्रगतीशील शेतकरी रूपाली पाटील व सुपारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुरूवातीला मान्यवरांचे हस्ते शेती उपयोगी साहित्याच्या स्टॉलची पाहणी करण्यात आली. प्रास्ताविक प्रशांत उंबरकर यांनी केले. संचालन प्रा. उज्वला शिरसाट यांनी केले.