शेतकऱ्यांनी सामूहिक सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा
By admin | Published: July 10, 2017 12:51 AM2017-07-10T00:51:12+5:302017-07-10T00:51:12+5:30
अल्प, अत्यल्प व मध्यम कोरडवाहू शेतकऱ्यांचे कृषी अवजारविना शेतीतील कोणतीही कामे थांबू नये. त्यांना इतर शेतकऱ्यांवर अवलंबून राहोव लागू नये ....
शैलेश नवाल : बोदड येथील केंद्राचा शुभारंभ, स्वामिनाथन फाऊंडेशन व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्प, अत्यल्प व मध्यम कोरडवाहू शेतकऱ्यांचे कृषी अवजारविना शेतीतील कोणतीही कामे थांबू नये. त्यांना इतर शेतकऱ्यांवर अवलंबून राहोव लागू नये म्हणून गावोगावी सामूहिक सुविधा केंद्र महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत कृषी विभाग व स्वामिनाथन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, आत्माचे प्रकल्प संचालक बनसोड, प्रकल्प समन्वयक किशोर जगताप, अश्विनी चावके, जीवनोन्नती अभियानाचे मनोज मेश्राम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पूढे म्हणाले की, अशा प्रकारचेच लहान-लहान अभिक्रम शेतकऱ्यांना मदतगार ठरणार आहे. त्याचप्रमाणे महिलांना हे उपक्रम त्यांचे सशक्तीकरण व विकास होण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. यानंतर असे केंद्र सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज पुरवठा केला जाईल.
भारती यांनी केंद्राचा उपयोग सर्वस्तरातील शेतकऱ्यांसाठी आहे. तो त्यांनी घ्यावा. सोबतच स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी इतरही व्यवसायांचा विचार करावा, असे सांगितले. बनसोड यांनी वर्धेत शासनातर्फे मॉल पद्धतीचे मार्केट बनविण्यात येत आहे. त्याचा उपयोग सर्व महिलांना होईल. ते कसे करता येईल, याचा विचार गावस्तरावर करावा, असे सांगितले. जगताप यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून हे केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया गावस्तर ते उच्चस्तर कशी झाली, केंद्र प्रभावीपणे कसे चालविता येईल व आर्थिक व्यवहार कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वामिनाथन फाऊंडेशनने यापूर्वी असे केंद्र लोनसावळी, भिडी व सोनेगाव (बाई) येथे २०१३ मध्ये सुरू केले आहे. हा अनुभव तथा जिल्हाधिकारी यांची कल्पकता व पुढाकार तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने बोदडसह केळापूर, कुरझडी, दहेगाव, नेरी, पालोती, आष्टा, पळसगाव असे नवीन ८ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. संचालन वनिता पाटील यांनी केले तर आभार दीपमाला मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला कल्पना गावंडे, साधना नेहारे, ग्रामसेविका वैशाली मरापे, प्रशांत निवल, प्रशांत अहिरराव, पुष्पा रामटेके, लता पंचभाई, दुर्गा वैद्य, सीता नाईक, चारूशीला ठाकरे, पंचफुला धुर्वे, सुमित्रा खोडे, संगीता धुर्वे, सुनील थूल, चंदू निवल, नाईक आदींनी सहकार्य केले.
केंद्रात उपलब्ध साहित्य
या केंद्रात वखर, डवरा, पेरणी यंत्र, साधे व पॉवर फवारणी पंप, इंजिन, स्प्रिंकलर पाईप व ताडपत्री आदी अवजारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. धान्य साफ करण्याची मशीन, कल्टीवेटर, सारा यंत्र उपलब्ध होणार आहे. ही अवजारे शेतकऱ्यांना कमी दरात भाड्यावर देण्यात येईल. दैनंदिन व्यवहारासाठी शेतकरी महिलांची संचलन समिती तयार केली आहे.