शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:50 PM2019-06-18T23:50:52+5:302019-06-18T23:52:08+5:30
शेतकऱ्यांचे राहणीमान व जीवन उंचावेल या दृष्टिकोनातून शासन अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन देवळी-पुलगाव क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिडी : शेतकऱ्यांचे राहणीमान व जीवन उंचावेल या दृष्टिकोनातून शासन अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन देवळी-पुलगाव क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केले.
उपविभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळी पंचायत समितीच्या सभापती विद्या भुजाडे होत्या. उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय हाडके, मंडळ कृषी अधिकारी अतुल जावळे व कृषितज्ज्ञ आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील यामध्ये अल्पभूधारक, भूमिहिन शेतकरी, शेतमजुरांनी व गरीब भूमिहिनांनी योग्य लाभ घ्यावा व आपले राहणीमान व जीवन उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार कांबळे यांनी केले. शेतकºयांच्या अनेक समस्या आहेत, याची जाणीव आहे. अस्मानी-सुल्तानी संकटांचा तो सातत्याने सामना करतो. खरीप, रबी, अशी पीके शेतकरी लागवडीपासून लहान मुलाप्रमाणे जपतात. पण वन्यप्राणी मात्र थोडक्यातच होत्याचे नव्हते करून शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. शासनाकडून मदत दिली जाते; मात्र ती पुरेशी ठरत नाही. पिकांचे नुकसान होऊच नये याकरिता वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी आमदार कांबळे यांनी केली. सत्य साई सेवा समितीच्या सभागृहात झालेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत कृषी संसोधक सहाय्यक प्रा. प्रदीप डवणे, फळ संशोधन केंद्र, कृषी अभियांत्रिकी विशाल उंबरहाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ. गजानन मसाळ व अन्य तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी शेती व विविध पिकांविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना पीआरसीच्या बियाण्यांचे आमदार कांबळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राऊत यांनी केले. तर आभार अतुल जावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता भिडी क्षेत्रातील कृषी सेवकांनी सहकार्य केले.