शेतकरी धडकले कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:41 AM2018-03-13T00:41:29+5:302018-03-13T00:41:29+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला. यात पदयात्रेत सहभागी शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून सोमवारी वर्धेत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांच्या मागण्या सादर केल्या.
शेतकºयांकडून स्वामिनाथन कमिशन प्रमाणे हमी दर द्या, बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा, कसणाऱ्या शेकऱ्यांच्या नावे वनजमिनी करा, वीज बिले माफ करा, आदी मागण्यांना करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे गेलेल्या शेतकºयांच्या मार्चोत राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ५० हजारावर शेतकरी सहभागी झाले आहेत. यात वर्धा जिल्ह्यातून निवडक शंभरावर शेतकरी सहभागी आहेत.
राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली नाहीच, शिवाय २०१७ मध्ये नाशिकमध्ये महामुक्काम शेतकरी आंदोलनाचे वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लिखित आश्वासनही पाळले नाही. त्यामुळे नाईलाजाने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा शेतकरी ‘लाँग मार्च’ निघाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या मागण्यांचे निवेदन
सर्व शेतमालाचे हमी दर स्वामीनाथन कमीशनप्रमाणे वाढवून द्या, ते दर बाजारपेठेत मिळतील अशी व्यवस्था करा. शेतमालाचा हमी दर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून निश्चित करा. सर्व शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा, लोडशेडींग बंद करा, शेतीला तेलंगणा व इतर राज्याप्रमाणे मोफत वीज पुरवठा करा. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ४० हजार रूपये नुकसा भरपाई द्या. अप्पर वर्धा-लोअर वर्धा या धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी पर्यायी जमिनीचे पैसे भरले. त्यांना पर्यायी जमीन द्या. त्यांना मिळणारा निर्वाह भत्ता वाढवून प्रती महा ४०० रूपयांऐवजी ३००० रुपये करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकारने उचलावा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १० लाख रूपये द्या. दुधाचे हमी दर प्रती लिटर ५० रूपये करा. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत भाजी मंडीचे निर्माण करा.यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.