शेतकरी पुत्राने विकसित केले डवरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:10 PM2019-08-03T22:10:44+5:302019-08-03T22:11:08+5:30
घरची परिस्थिती बिकट असताना व नोकरीच्या मागे न लागता घरीच साहित्याची जुळवाजुळव करून वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून ह्यडवरणी व कल्टीवेटर यंत्राची निर्मिती आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरची परिस्थिती बिकट असताना व नोकरीच्या मागे न लागता घरीच साहित्याची जुळवाजुळव करून वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून ह्यडवरणी व कल्टीवेटर यंत्राची निर्मिती आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी केली आहे.
अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र वरदान ठरणार आहे. साधारण शेतकऱ्यांकडे बैल जोडी नसते. पिकातील तण व्यवस्थापन करायचे असेल तर ९९ टक्के शेतकऱ्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. पिकातील दोन ओळीतील तण काढण्यासाठी जर वेळेवर डवरणी झाली नाही, तर मात्र तणाची वाढ होऊन पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण वाढते.
दिवसेंदिवस मजुराची संख्या कमी होत आहे. सोबतच मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा, न परवडणारा अशी नेहमी शेतकºयांची ओरड असते. मजूर न मिळाल्यामुळे वेळेवर शेतीची कामे होत नाहीत. बैलजोडी आणि मजूर यांची मजुरी ८५० रुपये द्यावी लागत होती. वेळ आणि पैसा याची बचत व्हावी म्हणून व शेतीची कामेही वेळेवर व्हावी हा विचार मनात ठेवून आधुनिकतेची कास धरत कृषी कन्या पॉवर कल्टीवेटर या नावाने उद्योग सुरू केला आहे. साधारणत: या यंत्रनिर्मितीकरिता १६ हजार रुपये खर्च आला आहे. एकरी १ लिटर डिझेल लागत असल्यामुळे पैशाची बचत होते. त्यामुळे या डवरणी यंत्राचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. विशेष म्हणजे, या डवरणी यंत्राच्या देखभालीची गरज नाही. त्याची पास बोथट झाली तरच त्याला धार लावावी लागते.
पिकाच्या दोन ओळीतील डवरणी करताना यंत्राचा त्रास होत नाही, कारण याचे पुढचे चाक मोठे असून, सर्व भार त्या चाकावर येत असल्याने शक्ती कमी लागते. या यंत्राला चालविण्यासाठी केवळ एकाच मनुष्याची गरज भासते. पिकातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता बैलजोडीचीही गरज भासणार नसून अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र वरदानच ठरणार आहे.
योगेशचा झाला सन्मान
मागील वर्षी नाशिक येथे आयोजित कृषीथॉन प्रदर्शनात योगेशचे डवरणी यंत्र प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्या यंत्राची दखल घेत योगेशला पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानितही करण्यात आले. दालनाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी या यंत्राविषयी माहिती जाणून घेत योगेशच्या पाठीवर कौतुकाची थाप देत दिली. ग्रामीण भागातही अभियंता दडले असल्याची प्रतिक्रिया दिली. दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे. बऱ्याचवेळा मजुरांचा तुटवडा जाणवतो. मिळालेच तर मजुरीचे दर गगनाला भिडलेले असतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी हे डवरणी यंत्र अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास योगेशने व्यक्त केला.