शेतकरी ग्रेडरवर भडकले
By Admin | Published: April 22, 2017 02:01 AM2017-04-22T02:01:26+5:302017-04-22T02:01:26+5:30
येथील बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तूर बाद करण्याचा प्रकार झाला.
नाफेडच्या तूर खरेदीतून वाद :मध्यस्थीने वाद निवळला
हिंगणघाट : येथील बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तूर बाद करण्याचा प्रकार झाला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ग्रेडरला मारहाण केली. यानंतर खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती. बाजार समिती सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मध्यस्ती केल्यानंतर तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
हिंगणघाट बाजार समितीत नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू आहे. ही खरेदी आता मोजक्या दिवसांकरिता असल्याने येथे शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. असे असताना ग्रेडरकडून खरेदी अत्यंत संथ गतीने सुरू होती. आज सुमारे ५ हजार पोती तूर विक्रीच्या प्रतीक्षेत या केंद्रावर होती; मात्र संथ खरेदी प्रक्रिया आणि ग्रेडिंगमध्ये तूर बाद करण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी संतप्त झाले. चार दिवस प्रतीक्षा केल्यानंतर तूर बाद करण्यात येत असल्याने काही शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. यावर त्यांनी ग्रेडर तुषार चांगले याला कारण विचारले असता त्यांच्याकडून थातुरमातुर उत्तर मिळाले. यामुळे शेतकरी व ग्रेडर यांच्यात वाद उद्भवला. हा वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्यांकडून ग्रेडरला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. ग्रेडर चांगले हा दहापैकी फक्त दोन शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत होता तर उर्वरित शेतकऱ्यांची तूर नापास करीत होता, असा संतप्त शेतकऱ्यांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांचा रोष वाढत असल्याने बाजार समिती सभापती अॅड. कोठारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली तसेच तुरीचे ग्रेडिंग योग्य प्रकारे करण्याची सूचना ग्रेडर चांगले यांना केली. नाफेडच्यावतीने नागपूर येथील दी विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थेद्वारे येथे तूर खरेदीची प्रक्रिया सुरू असून त्यांनी आवक वाढूनही फक्त एका ग्रेडरची नेमणूक या केंद्रावर केलेली आहे.
सुरू हंगामात या केंद्रावर केवळ ३७ हजार क्विंटल तुरीची खरेदी या संस्थेने केल्याची माहिती आहे. नाफेडची खरेदी प्रक्रिया अत्यंत संथगतीने असल्याने तसेच खरेदी केंद्रावर चार दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप तूर विक्रीकरिता आणलेली नाही, त्यामुळे नाफेडने खरेदीची मुदतवाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)