कर्जमुक्ती, हमीभावासाठी गुरूवारपासून शेतकरी संपावर
By admin | Published: June 1, 2017 12:32 AM2017-06-01T00:32:19+5:302017-06-01T00:32:19+5:30
शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव द्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागण्यांसाठी राज्यभरातील
सभेतील निर्णय : सहभागाकडे सर्वांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट/समुद्रपूर : शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव द्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी १ जूनपासून संपावर जात आहे. संपात जिल्ह्यातील शेतकरीही सहभागी होत आहे. सोमवारी दुपारी आमदार निवास नागपूर येथे झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
किसान क्रांती, शेतकरी संघटना, प्रोग्रेसिव्ह फार्मस् व शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या इतर संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. यात ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे १ जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जात आहे. संप मागण्या पूर्ण होईस्तोवर चालणार आहे. शेतकरी संपावर जाणार म्हणजे शेतीची कामे बंद करणार, असे नव्हे तर जागृती करून स्वत: पूरते पिकवावे, बाजारात माल विकू नये, शेतात कापूस व इतर रोख पिके घ्यावी, अन्न-धान्याचा पेरा कमी करून तुटवडा निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
संपाद्वारे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, समृद्धी मार्गाचा प्रकल्प रद्द करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत डांबरी रस्ते करा, फळभाज्यांनाही हमीभाव देत खरेदी करा, दुधाचे भाव ५० रुपये करा आदी मागण्या लावून धरण्यात येत आहे. संप काळात सभा, मेळावे, बैठका घेत गरजेपेक्षा अधिक अन्न-धान्याची पेरणी करू नये, बाजारात विकू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे. गावात राहून धरणे, उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनाला ४० संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
बैठकीला माजी आमदार सरोज काशीकर, मधुसूदन हरणे, शैलेजा देशपांडे, सतीश दाणी, निळकंठ घवघवे, उल्हास कोटंबकर, जीवन गुरनूले साहेब येंडे, गणेश माथनकर, सुनील हिवसे, शंकर घुमडे, चंद्रमणी भगत, माजी जि.प. सदस्य गजानन निकम, जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य रेखा हरणे, सुनंदा तुपकर, प्रकाश सेनाड, प्रकाश रोकडे, अंकुश चेले आदी उपस्थित होते.