मरणाच्या वाटेवर आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मरण तुडवितो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 04:51 PM2024-08-23T16:51:38+5:302024-08-23T17:04:16+5:30

शेतकऱ्यांची व्यथा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धाडसाला सलाम

Farmers struggle to achieve basic things for survival | मरणाच्या वाटेवर आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मरण तुडवितो!

Farmers struggle to achieve basic things for survival

प्रफुल्ल लुंगे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
सेलू :
पाठीवर १५ लिटरचा जहराचा डबा बांधून, पायाखाली मरण तुडवीत, अनेक भल्याभल्या संकटांना हुलकावण्या देत रामभरोसे जगणाऱ्या शेतकऱ्याला केवळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तळहातावर मरण घेऊन चालत राहावे लागते. हे चित्र एखाद्या एसीत राहणाऱ्या शहरी साहेबांनी खेड्यात येऊन पाहिले तर शेतकऱ्यांचा जीवनमरणाशी सुरू असलेला संघर्ष त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची ही व्यथा पाहून आपसूकच 'मरणाच्या वाटेवरती आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मृत्यू तुडवितो' ही शब्दरचना तोंडावर आल्याशिवाय राहत नाही.


कपाशी, सोयाबीनच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. अन्यथा पिकाऐवजी हाती पालापाचोळा येण्याची शक्यता असते. कंबरभर पिकात जमिनीवर काय आहे, हे दिसत नसताना पाठीवर कीटकनाशकाचा पंप घेऊन फवारणी करण्याचे धाडस कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छातीवर दगड ठेवून शेतकरी करीत आहे. वाढलेल्या पिकामुळे जमीन दिसत नाही, मग जमिनीवर सरपटणारे विषारी प्राणी, साप, विंचू कसे दिसणार! तरीही पायाखाली मरण तुडवीत शेतकरी हे धोकादायक काम कसे करत असेल याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. चुकून दुर्दैवाने विषारी सापावर पाय पडला अन् दंश केला तर? ही कल्पनाही करणे शेतकऱ्यांच्या परिवाराला अत्यंत वेदनादायक ठरते. बायकापोरांना कधीतरी सुखाचे दिवस दाखवू, या भोळ्या आशेवर रात्रंदिवस मरणाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आता कुणावरही भरवसा राहिला नाही. कोणतेही राज्यकर्ते आले तरी शेतकऱ्याच्या पाचवीला दारिद्र्य पुजलेले आहे, हे मात्र खरे! 


हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव 
कमरेपेक्षा जास्त वाढलेल्या पिकाची मशागत, फवारणी व इतर सर्व कामे जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला करावी लागतात. शहरी लोकांना २४ तास वीजपुरवठा पाहिजे. शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा असतो. त्या अंधाऱ्या रात्री पिकात जीव धोक्यात घालून त्याला ओलीत करावे लागते. सरपटणारे प्राणी, हिंस्त्र प्राणी केव्हा जीवाचा लचका तोडतील, याचा नेम नसतो. शेतकरी रात्री शेतात गेल्यावर त्याची बायका, मुलं अस्वस्थ होऊन त्याला घरी येण्याची वाट पाहत असतात, खरंच त्यांना झोप लागत असेल का? त्याची कल्पना कुणीच करीत नाही. शेतात गेलेला नवरा किंवा बाप परत येईपर्यंत या सर्वांचा जीव भांड्यात पडलेला असतो. निर्दयी राज्यकर्त्यांना व शासनाला याबाबत चिंतन करायला व मार्ग काढायला वेळच नाही. एवढ्या परिश्रमाने पिकवलेल्या मालाला फुटाण्याच्या भावात विकावे लागते. तरी आमच्या शासन मायबापाला लाज वाटत नाही, हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे.

Web Title: Farmers struggle to achieve basic things for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.