मृग कोरडा, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 09:01 PM2022-06-27T21:01:21+5:302022-06-27T21:02:11+5:30
Wardha News हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वर्धा: मृग नक्षत्र अक्षरशः कोरडे गेले. थोडासा पाऊस आल्याने पुढे पाऊस येईलच, या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड केली. पवनार परिसरात जवळपास ९० टक्के कपाशीची व साठ टक्के सोयाबीनची लागवड पूर्ण झालेली असून, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, ते ठिबक किंवा स्प्रिंग क्लारच्या साहाय्याने पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारनियमन असल्याने रोज फक्त आठ तास वीज मिळते. त्यातही तीन दिवस रात्री बारानंतर वीजपुरवठा सुरू होतो. जास्तीत जास्त एका पंपाद्वारे दोन एकरांतील पीक वाचविले जाऊ शकते. परिसरातील पूर्ण पेरणी वाया गेली असून, ज्याचे अंकुरण झाले, तेसुद्धा उन्हामुळे मेल्याचे दिसून येते. हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कृषी विभागाकडून शेतकऱ्याला मार्गदर्शन करून धीर देण्याची गरज आहे. अनुदानावर असलेले बियाणे न दिल्याने आधीच शेतकरी कृषी विभागावर नाराज आहेत. गाजावाजा करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले; परंतु महाबीजकडे बियाणे शिल्लक नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना बियाणे देण्यास असमर्थता दर्शविली. महाबीजकडे बियाणे नसतील तर बाजारात विक्रीसाठी आलेले बियाणे कोठून आले, असा सवाल शेतकरी विचारीत आहेत.
बारा एकरांत कपाशीची लागवड केली होती. पैकी दोन एकरांत ओलित करून कशीबशी वाचवली. दहा एकरांत दुबार पेरणीेला सुरुवात केलेली आहे. पाऊस आला तर दुबार पेरणी यशस्वी होईल. नाही तर शेत खाली ठेवण्याची नामुष्की ओढवेल.
- कुशाबा घुगरे
शेतकरी