विकासकामांनी शेतकऱ्यांची वाढविली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:19 PM2019-08-25T23:19:26+5:302019-08-25T23:20:36+5:30
जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : शासनाकडून केल्या जात असलेल्या विकासकामांमुळे सुविधेऐवजी गैरसोयच अधिक होत असल्याचे चित्र चिकणी परिसरात दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: महामार्ग जलयुक्त शिवार अंतर्गत निम्न वर्धा प्रकल्प यशोदा नदी खोरे पुनर्जीवनअंतर्गत नदी, नाले, खोलीकरण, रूंदीकरण, सरळीकरण आदी विकासकामे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचे वास्तव आहे.
विकास कामांमुळे डेरेदार वृक्ष धाराशाही पडलेत. तसेच जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.
अधिकाऱ्यांनी कामामध्ये अनियमितता दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खोदकामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. चिकणी, पढेगाव, वर्धा हा १६ कि.मी. अंतराचा डांबरी रस्ता असून या रस्त्यावर तीन ठिकाणी कालव्याच्या कामाकरिता खोदकाम करण्यात आले. भोयर यांच्या शेताजवळच्या वळणावर व रमेश नेहारे यांच्या शेताजवळ कालव्याच्या पाटसऱ्या टाकण्यात आल्यात. तिन्ही ठिकाणी डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण गरजेचे होते. परंतु, ठिकाणी माती टाकून बुजविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे वर्दळ असते. एसटी बससह स्कूलबस, दुचाकी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. खोदकामामुळे पडलेल्या खड्ड्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकरी तथा वाहनचालक करीत आहेत.
कामांचा दर्जाही सुमार
चिकणी जामणी, पढेगावसह अन्य भागात विकासकामे सुरू आहेत; मात्र कामांचा दर्जा सुमार असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. विकासकामे करताना निदान काही दिवस तग धरतील, अशी करावी, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.