बी.टी.वरील संशोधनाअभावी शेतकरी आत्महत्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:20 PM2017-12-08T23:20:03+5:302017-12-08T23:20:21+5:30
बीटी कॉटनच्या निर्मितीला १५ वर्ष होऊन त्यात कुठल्याही प्रकारचे नवीन जिन्स टाकून नवीन वाण निर्मितीचे कार्य करण्यात आले नाही.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : बीटी कॉटनच्या निर्मितीला १५ वर्ष होऊन त्यात कुठल्याही प्रकारचे नवीन जिन्स टाकून नवीन वाण निर्मितीचे कार्य करण्यात आले नाही. बीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी हे काम न केल्यामुळे कापूस उत्पादन क्षमता घटली. शेतीचा खर्च आवाक्याच्या बाहेर गेला. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला व आत्महत्या वाढल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले;पण कृषी प्रधान देशात शेतकरी अजूनही स्वतंत्र झाला नाही. या स्वातंत्र्यासाठी नवी क्रांती निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिव ब्रह्मांड राष्ट्रधर्म रक्षक दलाचे प्रमुख किशोर किनकर यांनी केले.
ब्रह्मांड पुराणम ऐक्य मंदिर विकास ट्रस्टच्यावतीने गुरुवारी महाकाळ येथे शिव ब्रह्मांड राष्ट्रधर्म रक्षक दलाची स्थापना करण्यात आली. तसेच शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीची कार्यकारीणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते. या समितीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकºयांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जनआंदोलन व शेतकरी जागृती कार्यक्रम करण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या मालाच्या हमीभावाचे पूर्णमुल्यांकन करणे, कापूस १८ हजार रूपये भावाची मागणी करणे, बोंडअळी आल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई व बी.टी. कॉटन बियाण्यांवर संशोधन करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. शासनाने कंपन्यांना नवीन जिन्स टाकून संशोधनासाठी परवानगी का दिली नाही, असा प्रश्न या बैठकीत शेतकºयांनी केला. शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतमालाच्या भावाबाबत धोरण ठरविण्यासाठी वर्धा येथे १५ डिसेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा यमुना लॉन येथून सकाळी ११ वाजता निघुन शिवाजी चौक, बजाज चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक होत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाहोचणार आहे. मोर्चाचे नेतृत्व किशोर किनकर करणार आहे. बैठकीत महाकाळ येथील कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात अध्यक्ष सुरज गोहो, उपाध्यक्ष प्रकाश मोहिते, सचिव अमोल चौधरी, कोषाध्यक्ष शैलेश कारामोरे, उपाध्यक्ष रमेश चारभे, नागेश थोटे, सहसचिव लोकेश ठाकरे तर सदस्य म्हणून सचिन पोडे, देवराव खेडेकर, संजय डोंगरे, भीमराव नाखले यांचा समावेश आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राजेश धोटे व शरद कांबळे यांनी केले आहे.
दहा हजार शेतकरी उभारी मोर्चात सहभागी होणार
संपूर्ण जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर झाला आहे. यामागची कारण जाणून घेण्यासाठी किशोर किनकर विदर्भाचा दौरा करीत आहे. व गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५डिसेंबर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात १० हजार शेतकरी सहभागी होतील.