वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतले शंभर कोटीवर कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:07 PM2021-01-05T12:07:29+5:302021-01-05T12:07:50+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटीवर कर्ज घेतल्याची नोंद असून सर्वधिक समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजही अनेक राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यात अवैध सावकारी करणारे अनेक प्रकरणे यापूर्वीही जिल्ह्यात उघड झाले आहेत, या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील अधिकृत सावकारांमध्ये दरवर्षी भर पडत आहे. यंदा वर्षभरात जिल्ह्यात १३९ सावकारांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटीवर कर्ज घेतल्याची नोंद असून सर्वधिक समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. आज प्रत्येकाला या ना त्या कामानिमित्त कर्जाची गरज असते. त्यात जवळपास प्रत्येक गावांमध्ये बँकाही जाऊन पोहचल्या आहेत. त्यामुळे कर्जासाठी बॅँकाचे उंबरठे अनेकांनी झिजवले आहेत. मात्र, बॅँकांकडून सर्वच गरजवंतांना कर्ज वाटप केले जात नाही. शिवाय बँकेचे कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच अनेकांची दमछाक होते. यासर्व बाबींमुळे आजही सावकारी पाश घट्टच असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या सावकारीत भर पडत आहे. जानेवारी ते डिसेंबर जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे १३९ अधिकृत सावकारीसाठी प्रस्ताव पाठविले होते. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात १३९ सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर व गरजवंत कर्ज घेऊन हजारो जण सावकारी पाशात अडकले आहेत. बँकांकडून कर्ज मिळाले तर सावकाराची पायरी चढण्याची गरजच पडणार नाही. मात्र, बँकांकडून कर्ज नाकारल्याने अनेक जण सावकारी पाशात अडकत चालल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
असे आहेत व्याजदर
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास तारणी कर्जासाठी नऊ टक्के, बिनतारी १२ टक्के, बिगरकृषी तारण कर्जासाठी १५ टक्के व बिगर कृषी विना तारणी कर्जासाठी १८ टक्के व्याजदर घेतला जातो. त्यामुळे सावकारी कर्ज घेणाऱ्यांना व्याजाची मोठी रक्कम अदा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
अधिकृत सावकारीसाठी निकष
अधिकृत सावकारींचा परवाना घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावात सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्रही गरजेचे असते. अधिकृत सावकारीचा परवाना देताना प्रस्ताव सादर करण्याची वित्तीय स्थिती कशी आहे, याचा विचार केला जात नाही.