पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:00 AM2020-12-29T05:00:00+5:302020-12-29T05:00:27+5:30
सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी पीक विमा एच्छिक असला तरी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. खरीप हंगाम सुरू झाल्यावर सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत लेखी तक्रार विमा कंपनी व कृषी विभागाला केली. सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षी ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी केवळ २८.३८ टक्केच शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे विमा कंपनी मनमना करीत असल्याचे दिसते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या लेखी तक्रारी
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीकविमा काढणाऱ्यांपैकी तब्बल ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनी तसेच कृषी विभागाला तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी सादर करून किमान अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी एकाही शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही.
मागील वर्षी दिली ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना भरपाई
मागील वर्षी तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे कवच घेतले होते. पण विमा कंपनीने ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती. विमा काढणाऱ्यांच्या तुलनेत हा टक्का २८.३८ होता.