प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:05 AM2019-01-21T00:05:58+5:302019-01-21T00:07:53+5:30
धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनीचे व गावांचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून शासनालाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पुनर्वसनाच्या प्रक्रि येत अनेक शेतकरी उद्धवस्त झालेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनीचे व गावांचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून शासनालाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पुनर्वसनाच्या प्रक्रि येत अनेक शेतकरी उद्धवस्त झालेत. पण, आता शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण केले जाणार नाही, असे मत विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सारवाडी येथे केंद्र सरकारच्या जलसंधारण नगरविकस आणि गंगा संरक्षण विभागाच्यावतीने देशातील पहिल्या ब्रीज कम बंधाऱ्याची पायाभरणी ना. सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, केंद्रीय भूजल बोर्डाचे अध्यक्ष सुधीर दिवे, के.स.नायक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, कारंजा पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जलतज्ज्ञ माधव कोेटस्थाने, जिल्हा परिषद सदस्या रेवता धोटे, सुरेश खवशी, सरपंच अर्चना धुर्वे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ना.देशमुख म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात चार व तिवसा येथे १ असे पाच बंधारे प्रायोगिक तत्वावर देशात प्रथमच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने होत आहे. यासाठी २५ कोटीचा निधी दिला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार असून उत्पादनातही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातही ब्रिज कम बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. खासदार रामदास तडस, सुधीर दिवे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच खडतकर कंस्ट्रक्शन कंपनीने नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याची हमी दिली. यावेळी विद्यमान आमदार अमर काळे व माजी आमदार दादाराव केचे यांच्या भाषणातील जुगलबंदी जनतेच्या मनोरंजनाचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे संचालन साक्षी नरसिंगकार हिने केले तर आभार समाजसेवक संजय यावले यांनी मानले.
माधव कोटस्थाने सन्मानित
सारवाडी येथे देशातील पहिल्या ब्रीज कम बंधाऱ्याची पायाभरणी करण्यात आली. या बंधाºयाच्या कामाकरिता जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांनी वेळोवेळो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळेच या प्रकल्पाची पायाभरणी झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कोटस्थाने यांच्या योगदानामुळे विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.