शेतकरी महिलांचा तहसीलदारांना घेराव
By admin | Published: March 17, 2016 02:42 AM2016-03-17T02:42:15+5:302016-03-17T02:42:15+5:30
शासनाच्या योजनांपासून वंचित शेकडो गरीब शेतकरी आणि मजूर महिलांनी निवेदन देण्याकरिता बुधवारी दुपारी २ वाजता मोर्चा काढला.
कक्षापूढे ठिय्या : कार्यालयाची दारे तोडून केला शिरकाव
समुद्रपूर : शासनाच्या योजनांपासून वंचित शेकडो गरीब शेतकरी आणि मजूर महिलांनी निवेदन देण्याकरिता बुधवारी दुपारी २ वाजता मोर्चा काढला. दरम्यान, तहसीलदारांनी निवेदन घेण्यासाठी बाहेर येण्यास नकार दिला. यामुळे महिलांनी तहसीलचे मागील आणि मुख्य दारे तोडून आत शिरकाव करीत तहसीलदार सचिन यादव यांच्या कक्षासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.
महिलांच्या निवेदनानुसार, घरकूल, निराधार आदी योजनांचा लाभ गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना डावलून मोठ्या शेतकऱ्यांना देण्यात आला. या गंभीर बाबीची चौकशी करून कारवाई करावी, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, सिंचन योजना लागू करावी, शेतमालाला बोली लावण्याची योजना लागू करावी, विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यात यावे, विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी महिलांनी मोर्चा काढला. यामुळे पोलिसांसह तहसील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हा मोर्चा क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेच्यावतीने काढण्यात आला होता.