चण्यासाठी शेतजमीन ओके; पण खुर्चीतून गुरगुरताहेत कृषीचे बोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 09:50 PM2022-11-16T21:50:17+5:302022-11-16T21:51:06+5:30
यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चण्यासाठी जमीन ओके असल्याचे कृषि तज्ज्ञांकडून बोलले जात असले तरी खुर्चीत बसून कृषी विभागाचे बोके सध्या गुरगुरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८ टक्के रब्बी पिकांची लागवड झाली. पण अनेक शेतकऱ्यांना चणा की गव्हाची लागवड करावी, असा प्रश्न सतावत आहेच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.
यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे. पण कृषी विभागाचे निगरगठ्ठ अधिकारी खुर्चीत बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांमधील पीक लागवडीबाबतच्या समस्या कायम आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर या सांभाळत आहेत. पण त्यांनाही या दोन्ही पदाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वर्धा येथे कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देण्याची गरज आहे.
चणा पिकालाच दिली जातेय पसंती
- जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८० टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. आतापर्यंत ज्वारीची २९१ हेक्टरवर, ७१९ हेक्टरवर गहू, ६३ हेक्टरवर मका तर ८ हजार ८० हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत झालेल्या पेरणीच्या आकडेवारीवरून शेतकरीही यंदा चणा पिकाला पसंती देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मातीत बऱ्यापैकी ओलावा आहे. यंदा रब्बीतील चणा पिकासाठी उत्तम आहे. चणा पीक विना मशागत घेता येते. पण शेतातील गवत काढणे गरजेचे आहे. चणा पिकाला दोन किंवा तीन वेळा सिंचनाची गरज असते. तर गहू पिकाला किमान चार वेळा सिंचनाची गरज असते. शिवाय जमिनीची मशागतही करणे क्रमप्राप्त असते.
- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.