कापूस भावातील तेजीचा उत्पादकांना फायदा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:27 PM2019-03-12T22:27:54+5:302019-03-12T22:28:32+5:30
कापसाचे उत्पादन कमी असल्याने भविष्यात भाववाढ होईल, या आशेने घरी भरून ठेवलेला कापूस मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार ३०० रुपयांत विकला. ८ मार्चपासून कापसाच्या भावात कासवगतीने का होईना पण तेजी येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : कापसाचे उत्पादन कमी असल्याने भविष्यात भाववाढ होईल, या आशेने घरी भरून ठेवलेला कापूस मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार ३०० रुपयांत विकला. ८ मार्चपासून कापसाच्या भावात कासवगतीने का होईना पण तेजी येत आहे. तेजी येतच राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केल्याने ज्यांनी पडेल भावात कापूस विकला, त्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. यंदाही कापूस भावातील तेजीच्या फायद्यापासून कापूस उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहे.
जगातील सर्वच कापूस उत्पादक देशात यंदा कापसाचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे कापसाचे भाव वाढणार, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. सुरुवातीलाच सहा हजारांपर्यंत भाव मिळाल्याने भाववाढ होणार या विचाराला दृष्टी मिळाली होती. सुरुवातीला गरजूंनी आपला कापूस विकून चांगल्या भावाचा फायदा घेतला असला तरी भविष्यात भाववाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस न विकता घरी साठवून ठेवला. १५ डिसेंबर २०१८ पासून ७ मार्च २०१९ पर्यंत कापसाचे भाव प्रतिक्विंटल ५ हजार ६०० पासून ५ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आले. साठविलेल्या कापसामुळे घरी वापर अडचणीचा झाला.
कापसातील बोंडअळीच्या स्पर्शामुळे त्वचारोगांनी तोंड वर काढले. कित्येकांंना खाजेची लागण झाली. आर्थिक गरजेतून कापूस विकण्याची वेळ आली. दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या गेलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानला होणारी निर्यात थांबल्याने भाव घसरणार, अशी सोईस्कर अफवा पसरविण्यात आली.
मार्चमध्ये तापमानवाढीमुळे कापूस घरी साठवून ठेवणे धोक्याचे असते. या सारख्या कारणांसह आता कापूस भाव वाढण्यापेक्षा पुढे कमीच होतील, अशी चर्चा व्यापाऱ्यांकरवी सातत्याने समाजात पसरविल्याने घरी साठवून ठेवलेला ७० टक्के कापूस उत्पादकांनी आपला कापूस ५ हजार ३०० रुपये इतक्या पडेल भावाने विकला. दरवर्षी १५ मार्चपर्यंत ३०० लाख कापूस गाठी बांधता येईल. एवढा कापूस खरेदी होत असे, यंदा मात्र १५ मार्चपर्यंत २३० लाख गाठी बांधता येईल एवढाच कापूस खरेदी होणार आहे.
आता १० टक्केही कापूस शेतकऱ्यांजवळ विक्रीसाठी शिल्लक नाही. यावरून भविष्यात कापसाला ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल, हा अंदाज खरा ठरणार याबाबत पुष्टी मिळते. असे झाले तर थोडे थांबलो असतो तर फायदा झाला असता, असे म्हणून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ खऱ्या कापूस उत्पादक शेतकºयांवर येणार व खासगी व्यापाऱ्यांचे चांगभले होणार, यात शंका नाही.
..तर व्यापाऱ्यांचेही होणार चांगभले
अनेकांनी कापूस विकल्यानंतर आता ७ मार्चपासून कापसाच्या भावात तेजी येऊन भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंत चढले आहे. ही भाववाढ संथ असली तरी जाणकारांच्या मते यापुढे भाव वाढतच राहील व ते ६ हजारांपर्यंतही जाऊ शकतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यात व्यापाऱ्यांचीही चांदी होणार, हे मात्र खरे.