अर्धवट पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
By admin | Published: September 28, 2016 01:48 AM2016-09-28T01:48:37+5:302016-09-28T01:48:37+5:30
सेलू ते झडशी मार्गावर वडगाव येथे काही महिन्यांपूर्वी ठेंगणा पूल उंच करण्यासाठी निधी मंजूर केला होता.
सेलू ते झडशी मार्गावरील प्रकार : कंत्राटदाराने बांधकाम ठेवले अर्धवट, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
झडशी : सेलू ते झडशी मार्गावर वडगाव येथे काही महिन्यांपूर्वी ठेंगणा पूल उंच करण्यासाठी निधी मंजूर केला होता. पुलाच्या कामाला सुरूवातही करण्यात आली. पावसाळा सुरू झाल्याने सदर काम अर्धवटच सोडण्यात आले. परिणामी, ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
सेलू ते झडशी मार्गावर वडगाव येथे अत्यंत ठेंगणा पूल होता. थोडा पाऊस आला तरी या पुलावरून पाणी राहत होते. परिणामी, वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत होता. यामुळे आमदार निधीतून उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले. सदर कामास कंत्राटदाराने सुरूवातही केली; पण ते अर्धवट सोडण्यात आले. नव्याने बांधकाम केलेल्या पुलावर दोन्ही बाजूला कठडे बसविणे गरजेचे होते; पण ते काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. पूल उंच झाला असल्याने तो आता अधिक धोकादायक झाला आहे. अगदी पुलाला लागून सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे. तेथे खोलगट भाग निर्माण झाला. पाणी जमा होऊन आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)