जीवघेणे खड्डे; अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:45 PM2017-09-18T23:45:04+5:302017-09-18T23:45:37+5:30
देवळी-पुलगाव मार्गावर पावसामुळे अनेक जीवघेणे खड्डे तयार झाले आहे. ही बाब वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी-पुलगाव मार्गावर पावसामुळे अनेक जीवघेणे खड्डे तयार झाले आहे. ही बाब वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी ठरत आहे. सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे झाले आहे.
सदर मार्गावर देवळी तालुक्यातील दहा ते बारा गाव जोडली आहे. त्यामुळे या मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुक सुरू असते. चिकणी, जामणी, दहेगाव (स्टे.), दहेगाव (गा.), केळापुर, मलकापुर, बोदड, कवठा (रे.), कवठा (झोपडी) या गावांना आवागमन करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच निमगाव (स.), आंबोडा, वायफड, कुरझडी, पडेगाव आदी गावे या मार्गाला जोडली जातात. सद्यस्थितीत या मार्गाने वाहन चालविणे म्हणजे चालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात येथे दुर्घटना होऊ शकते. प्रवाशांना खड्ड्यांमुळे त्रास होतो.
रस्त्याची झाली चाळणी
खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये दोष येत आहे. शिवाय खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता आहे. या रस्त्याने जाताना चालकाला खड्ड्यातुन रस्ता शोधावा लागतो. काही ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. सदर मार्गावर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याच्या कडाही जमिनीत रुतल्या आहे. त्यामुळे खड्डे चुकविण्यासाठी प्रसंगी वाहन रस्त्याच्या खाली उतरविण्याची गरज भासली तर अपघात होऊ शकतो. या रस्त्याच्या कडा भरणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याबाबत प्रत्यक्ष कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदारांच्या संपामुळे सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास विलंब झाला आहे. आम्ही रस्त्याची पाहणी केली आहे. प्रसंगी विभागाचे मजूर कामावर लावून तातडीने खड्डे बुजविण्यात येतील.
-अनिल भूत, सा.बां. विभाग, अभियंता उपविभाग, देवळी.