बसपाच्या मतांवर ठरणार विजयाचे भवितव्य
By admin | Published: October 11, 2014 02:06 AM2014-10-11T02:06:53+5:302014-10-11T02:06:53+5:30
विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहे़ या निवडणुकीत १० अपक्षांसह ९ राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात आहेत.
प्रभाकर शहाकार पुलगाव
विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहे़ या निवडणुकीत १० अपक्षांसह ९ राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात आहेत. काहींचा प्रचार सुरू झाला तर काहींच्या नावाचाही उल्लेख नाही; पण कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजपा, शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या मैफली चांगल्याच रंगू लागल्या आहेत़ आघाडीची बिघाडी झाली असली तरी कॉँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याच दिसून येते.
देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे रणजित कांबळे, भाजपाचे सुरेश वाघमारे, राष्ट्रवादी काँगे्रसचे शशांक घोडमारे, शिवसेनेचे निलेश गुल्हाणे, रिपब्लिकन पक्षाचे (खोरीपा) चंद्रकांत वाघमारे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे दीपक फुसाटे, बसपाचे उमेश म्हैसकर, भारीपचे अशोक रामटेके, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय कारामोरे, रिपाइं (आ़) चे महेंद्र मुनेश्वर यांच्यासह ज्ञानेश्वर निघोट, प्रवीण फटींग, विश्वेश्वर तागडे, माणिक वानखेडे, अजय हिवंज, किरण पारिसे, मनोज मानवटकर, नामदेव मेश्राम व अरुण पचारे हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत़
कॉँग्रेसचे उमेदवार या मतदार संघात प्रचारात अग्रेसर असून खेडोपाडी, शहरातही कार्यकर्ते व मतदार यांच्या भेटीगाठी घेत प्रचार करीत असल्याचे दिसते़ प्रचारासाठी अखिल भारतीय महिला कॉँग्रेसच्या महासचिव चारूलता टोकस, उमेदवारांच्या अर्धांगिनी पूनम कांबळे, माजी पं़स़ सभापती मनोज वसू यांच्या प्रचार गाड्या मतदार संघात धावत असल्या तरी कित्येक दशकापासून कॉँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेला हा मतदार संघ कॉँग्रेसच्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे दिसते़ पक्षामध्ये दबदबा असलेल्या माजी खासदारांनी भाजपाची साथ स्वीकारून काँगे्रसचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचे प्रयत्न चालविले आहे़ त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते, हेही पाहावे लागणार आहे़
सोबतच भाजपाचे विद्यमान खासदार २००९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वजनामुळे झालेला पराभव विसरणार काय, हा प्रश्न मतदारांत चर्चिला जात आहे. दुसरीकडे अनेक वर्षांपासून आघाडी करून लढणारे कॉँग्रेस व राष्ट्रवादी या निवडणुकीत एकमेकांविरूद्ध दंड थोपटून उभे आहेत. एकेकाळी हातात हात मिळविणारे कॉँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे मनापासून एकमेकांविरूद्ध दंड थोपटून शेवटपर्यंत उभे राहतील काय, असाही प्रश्न सर्वसामान्य मतदार आणि संभ्रमात असलेले कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत़
सध्या देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप हे तीन उमेदवार प्रचार मोहिमेत आघाडीवर असले तरी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १५ हजारांपेक्षा अधिक मते घेणाऱ्या बहुजन समाज पार्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या पक्षाचे उमेदवार प्रस्थापितांबरोबर चालत आहे. त्यांना मिळणाऱ्या परंपरागत मतांचा आकडा त्यांनी ओलांडला तर आघाडी व युती तोडून स्वतंत्रपणे लढणाऱ्या कॉँग्रेस, राकॉँ व भाजपा, सेना यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे़
मतदार संघात भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची, काँगे्रस उमेदवारासाठी अशोक गहलोत याची तर भाजप उमेदवारासाठी अमित शहा यांची सभा पार पडली़ प्रचार यंत्रणेकडे पाहता कॉँग्रेसचा उमेदवार शहरी भागासह ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष देत असल्याचे दिसते़ भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीचा कलही ग्रामीण भागाकडे अधिक दिसतो़ सध्याची स्थिती पाहता मतदार संघात बहुरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे लढत असल्याने मतांचे विभाजन निश्चित आहे़ या विभाजनाचा फायदा व तोटा कुणाला होणार, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे़ यामुळे सर्वांतच धास्ती दिसून येत आहे़