पिपरीत वडिलांकडून मुलाची तर सेवाग्रामात एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 05:00 AM2022-07-08T05:00:00+5:302022-07-08T05:00:11+5:30

या दोन्ही प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नारायण चचाणे (३२)  रा. पिपरी (मेघे) असे पिपरी (मेघे) येथील घटनेतील तर अरुण थुल (६२) असे सेवाग्राम येथील घटनेतील मृताचे नाव आहे. पिपरी (मेघे) येथील घटनेतील आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली असून, सेवाग्राम येथील घटनेतील आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत.

Father kills son in Pipari and one in Sevagram | पिपरीत वडिलांकडून मुलाची तर सेवाग्रामात एकाची हत्या

पिपरीत वडिलांकडून मुलाची तर सेवाग्रामात एकाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पैशाच्या कारणावरून वाद करून बापानेच थेट मुलाला ठार केल्याची घटना वर्धा शहरानजीकच्या पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीत घडली. तर क्षुल्लक कारणावरून वाद करीत वयोवृद्ध व्यक्तीची निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना सेवाग्राम भागातील हावरे ले-आउट परिसरात घडली. या दोन्ही प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नारायण चचाणे (३२)  रा. पिपरी (मेघे) असे पिपरी (मेघे) येथील घटनेतील तर अरुण थुल (६२) असे सेवाग्राम येथील घटनेतील मृताचे नाव आहे. पिपरी (मेघे) येथील घटनेतील आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली असून, सेवाग्राम येथील घटनेतील आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. वर्धा शहराच्या शेजारीच असलेल्या पिपरी( मेघे) येथील बेघर वस्तीत आणि सेवाग्राम येथील हावरे ले-आउट भागात हत्येची घटना घडल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देत बारकाईने पाहणी केली.

गोव्यात अरुणचा आहे बियर बार
- मृत अरुण थुल हा गोवा येथे काही वर्षांपूर्वी स्थायी झाला असून त्याचा तेथे बियर बार असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. तो सेवाग्राम येथील घरी एकटा असताना आरोपीने त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्यास जीवानीशी ठार केले. पोलिसांच्या सखोल तपासात नेमके काय पुढे येते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मृत अरुणच्या पार्थिवाची उत्तरिय तपासणी कस्तुरबा रुग्णालयात डॉ. प्रवीण झोपाटे आणि डॉ. हर्षलता चव्हाण यांनी केली.

अरुण थुल झाला होता गोव्यात स्थायी
- अरुण थुल हा गोवा येथे काही वर्षांपूर्वी स्थायी झाला असला तरी त्यांचे सेवाग्राम येथील हावरे ले-आउट येथे घर आहे. तो काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह गोवा येथून सेवाग्राम येथे आला होता. नंतर त्याचे कुटुंबीय गोव्याला परतले; पण तो सेवाग्राम येथेच थांबला होता. अशातच अज्ञात व्यक्तीने अरुणच्या घरात प्रवेश करून त्याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्यास ठार केले. ही बाब लक्षात येताच अरुणच्या भावाने सेवाग्राम पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घरगुती कारणावरून झालेला वाद विकोपाला जात अरुणची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जड वस्तूने केला विशालच्या डोक्यावर प्रहार

पैशाच्या कारणावरून वाद करून नारायण चचाणे याने मुलगा विशाल चचाणे यास बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. आरोपीने निर्दयतेचा कळस गाठून विशालच्या डोक्यावर जड वस्तूने गंभीर प्रहार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेच्या वेळी विशालची आई घरी नव्हती. विशालची आई बेबी या घरी परतल्यावर त्यांना मुलगा अरुण रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कसेबसे सावरत घटनेची माहिती परिसरातील नागरिकांसह रामनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी बेबी चचाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी नारायण चचाणे याच्याविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Father kills son in Pipari and one in Sevagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.