हिंगणघाटसह आर्वीत वाघाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:12 AM2018-10-06T00:12:20+5:302018-10-06T00:12:39+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने सध्या अनेकांच्या अडचणीत भर टाकली आहे. सावंगी (हेटी), दारोडा असा प्रवास करीत तिवसळी पर्यंतचा प्रवास या साडेतीन वर्षाच्या वाघाने आतापर्यंत पूर्ण केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने सध्या अनेकांच्या अडचणीत भर टाकली आहे. सावंगी (हेटी), दारोडा असा प्रवास करीत तिवसळी पर्यंतचा प्रवास या साडेतीन वर्षाच्या वाघाने आतापर्यंत पूर्ण केला आहे. वाघ हा एकाच ठिकाणी बराच कालावधी वास्तव्य करीत नसून तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जावा यासाठी सध्या वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. वन विभागाच्या कॅमेरात कैद झालेल्या या वाघाकडून आतापर्यंत दोन पाळीव प्राणी ठार करण्यात आले आहेत. नागरिकांनीही दक्ष राहिल्यास पुढील अनुचित घटना टाळता येते. त्यामुळे नागरिकांनीही सदर वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सावंगी (हेटी) शिवारात सर्वप्रथम दर्शन
या वाघाचे दर्शन वर्धा जिल्ह्यातील सावंगी (हेटी) परिसरात काही शेतकºयांना होताच त्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत सदर वन्य प्राणी हा वाघच असल्याचे पुढे आले आहे. तो सध्या हिंगणघाट तालुक्यातील तिवसळी परिसरात असल्याचे बोलले जात असून शेतकऱ्यांसह शेतमजुर व ग्रामस्थांनी दक्ष राहिल्यास अनुचित घटना टाळता येते.
पिंजराही सज्ज
हिंगणघाट तालुक्यातील काही गावांमध्ये मुक्तसंचार होत असलेल्या वाघाने आतापर्यंत कुठल्याही मनुष्यावर हल्ला चढविला नसला तरी काही पाळीव प्राण्यांना गतप्राण केल्याचे वास्तव आहे. शिवाय वाघाच्या दहशतीमुळे शेतातील विविध कामे ठप्प आहेत. काही दिवसांपासून वन विभागाची चमू जंगलात गस्त घालत असून वन विभागाने या वाघाला पकडून सुरक्षीत ठिकाणी सोडण्यासाठी पिंजराही सज्ज केला आहे. सदर पिंजरा सध्या सावंगी परिसरात असला तरी वाघाचे खात्रिदायक लोकेशन मिळताच तो योग्य ठिकाणी ठेवून वाघाला पकडून त्याला सुरक्षीत ठिकाणी सोडण्यात येईल, असे वन विभागाच्यावतीने सांगण्यात येते.
तिवसडा येथे गाय केली ठार
पोहणा/वडनेर : नजीकच्या तिवसडी परिसरात वसंत इटनकर यांच्या मालकीची गाय वाघाने ठार केली. यामुळे सदर पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. वाघाचा मुक्तसंचार होत असल्याने तहसीलदारांनी पोहणा, बोपापूर, पिपरी, वडनेर आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथे दवंडीही देण्यात आली आहे. या परिसरात वन विभागाची चमू गस्त घालत आहे. दारोडा टोलजवळ पिंटू घोडमारे यांच्या कुक्कुटपालन जवळ काम करणाºया कर्मचाºयांला सकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास व्याघ्र दर्शन झाले. त्या कर्मचाºयांनी दक्ष राहून परिसरातील एका घरात आसरा घेतला होता. माहिती मिळताच वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये व वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सध्या टेंभा, दोदुर्डा, वडनेर, दारोडा, छोटी आर्वी, काचनगाव, सिरसगाव परिसरात वन विभागाच्या विशेष चमुकडून गस्त घातली जात आहे. असे असले तरी परिसरात नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत असल्याचे दिसून येते.
शाळेला दिली सुट्टी
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर नजीकच्या निमुघटवाई शिवारात व्याघ्र दर्शन झाल्याने या भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निमुघटवाई येथील शाळा गावाजवळून थोडी लांब आणि झुडपी जंगल परिसरात असल्याने कुठलाही अनुचित घटना टाळता यावी या हेतूला केंद्रस्थानी ठेवून शुक्रवारी शाळेला सुट्टी देण्यात आली. ही सुट्टी गटशिक्षणाधिकाºयांनी जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
चार कॅमेरेच्या माध्यमातून ठेवली जातेय पाळत
सदर वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वन विभागाने जंगलात चार ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. या चार कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्यात हा वाघ कैदही झाली आहे. वाघिण नसून तो वाघच असल्याचेही वन विभागाला प्राप्त झालेल्या छायाचित्रातून स्पष्ट झाले आहेत. वडनेर परिसरातील कुणालाही व्याघ्र दर्शन झाल्यास त्यांनी तात्काळ त्याची माहिती दक्षता बाळगत वन विभागाच्या अधिकाºयांना द्यावी, असे आवाहनही वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. तसेच नागरिकांनी कुठल्या गोष्टी टाळाव्यात यासाठी वन विभागाच्यावतीने ज्या ठिकाणी सध्या वाघाचा वावर आहे त्या परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच अनुषंगाने गावात दवंडीही देण्यात आली आहे.